Breaking News

जवंजाळांच्या वर्गात भुजबळांची शिकवणी

सार्वजनिक बांधकाम :  कॅटच्या अहवालात गंभीर ताशेरे; धवडही आहेत मास्टरमाईंड

नाशिक, विशेष/प्रतिनिधी, दि. 18 - प्रशासकीय अधिकार्‍यांची इच्छा असल्याशिवाय संबंधित विभागाच्या मंत्र्यांना घोटाळा करता येत नाही. या सत्यावर  साबांसंदर्भातील एका प्रकरणावर कॅटने ओढलेल्या ताशेर्‍यांनी प्रकाश टाकला आहे. किंबहूना प्रशासकीय अधिकारीच संबंधित खात्याच्या मंत्र्यांचे भ्रष्टाचाराचे गुरू  असतात यावर कॅटच्या अहवालाने शिक्कामोर्तबच केले आहे. सायन-पनवेल आणि भिवंडी - चिंचोली महामार्गासंदर्भात काढलेल्या निविदासंदर्भांत आलेल्या  आक्षेपांशी संबंधित हा अहवाल
असून, या अहवालात तत्कालीन कार्यकारी अभियंता आणि मुंबई साबांमंडळाचे विद्यमान अधिक्षक अभियंता राजेंद्र जवंजाळ यांच्या  कार्यशैलीवर ठपका ठेवण्यात आला आहे. या अहवालातील ताशेरे वाचल्यानंतर 2007 मध्ये कार्यकारी अभियंता राजेंद्र जवंजाळ यांनीच प्रथम तत्कालीन  साबांमंत्री छगन भुजबळ यांना भ्रष्टाचाराची बाराखडी शिकविली असा निष्कर्ष काढण्यास पुरेसा वाव मिळतो.
या संदर्भात कॅटने दिलेल्या अहवालाच्या पार्श्‍वभूमीवर मिळालेली माहिती अत्यंत गंभीर स्वरूपाची आहे. 2007 आणि 2009 या दोन आर्थिक वर्षात  भिवंडी-चिंचोली आणि सायन पनवेल या दोन महामार्ग बांधणींच्या कामासाठी अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली होती. तेव्हा कार्यकारी अभियंता म्हणून राजेंद्र  जवंजाळ हेच कार्यरत होते. तत्कालीन साबांमंत्री छगन भुजबळ यांच्या मर्जीतील कंत्राटदारांना सदर महामार्ग बांधणीचे काम मिळावे यासाठी कार्यकारी अभियंता  राजेंद्र जवंजाळ यांनी पध्दतशीरपणे नियोजन केले आणि साबांत घोटाळे कसे करायचे असतात यासाठी छगन भुजबळ यांची शिकवणी घेतली. भुजबळांचा  विश्‍वास संपादन केला. विशेष म्हणजे जेव्हा हे प्रकरण चर्चेत येऊन चौकशीची मागणी जोर धरू लागली तेव्हा तत्कालीन साबां सचिव धनंजय धवड (धनू)  जवंजाळ यांच्या मदतीला धावून आले. आणि तळं राखणार्‍या चौकीदाराने केलेल्या पाणीचोरी प्रकरणाची चौकशी करण्यासाठी त्याच चौकीदाराची नियुक्ती करावी  अशा प्रकारे हे प्रकरण गुंडाळण्याचा प्रयत्न केला. हे सारे षडयंत्र कॅटच्या निदर्शनास आल्यानंतर कॅटने त्याची गंभीर दखल घेतली आणि अहवालात ताशेरे ओढून  स्पष्ट नाराजी व्यक्त केली आहे.  
सध्या ऑर्थर तुरूंगात प्रायश्‍चित भोगत असलेले छगन भुजबळ यांना भ्रष्टाचार कसा करायचा याची शिकवण 2007 मध्ये तत्कालीन कार्यकारी अभियंता आणि  विद्यमान अधिक्षक अभियंता राजेंद्र जवंजाळ यांनी दिली. आश्‍चर्य वाटेल,  पण माहिती खरी आहे कुठलाही मंत्री अशा गोष्टीशी सुरूवातीला परिचित नसतो.  प्रशासनातील ‘तज्ञ’ वर्षानुवर्षाच्या अनुभवातून मिळालेले ‘ज्ञान’ मंत्र्यांपर्यंत पोहचवितात, या अनुभूतीतून मंत्रीही पुढे तरबेज होतात. साबांत भुजबळांच्या नावावर  नोंदविल्या गेलेल्या अनेक घोटाळ्यांची वाटचाल अशीच ‘प्रशासकीय’ आहे. ‘पाप अभियंत्याचे सजा मात्र एकट्या भुजबळांना’ हे चित्र एका अर्थाने अन्यायावरच  शिक्कामोर्तब करते. कॅटने दिलेला अहवालही अप्रत्यक्षपणे हेच सांगतो. भुजबळांचे खर्‍या अर्थाने गुरू असलेले राजेंद्र जवंजाळ आज मुंबई साबां मंडळात अधिक्षक  अभियंता आहेत तर भुजबळ....? (क्रमशः)