Breaking News

बा विठ्ठला! राज्य सुजलाम सुफलाम होवू दे !

मुख्यमंत्र्यांचे विठुरायाचरणी साकडे

पंढरपूर, दि. 15 - भागवत धर्म व वारकरी संप्रदायाने महाराष्ट्राला एक वेगळी सांस्कृतिक ओळख निर्माण करून दिली असून, या परंपरेने ऊर्जा, संस्कार व समता मानवी जीवनाला बहाल केला. प्रत्येक आषाढी ही निर्मल वारी व्हावी यासाठी राज्य शासनाच्या वतीने सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, राज्यात सर्वदूर पाऊस पडू दे, राज्यातील शेतकरी सुखी होवू दे, राज्य सुजलाम सुफलाम होवू दे असे साकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी विठूरायाचरणी घातले. 
पंढरपूर येथे आज आषाढी एकादशी निमित्त शासकीय महापुजेनंतर आयोजित सत्कार समारंभात ते बोलत होते. यावेळी त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस, कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर, पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर, पशुसंवर्धन, मत्स्य व दुग्धविकासमंत्री महादेव जानकर, सोलापूरचे पालकमंत्री विजय देशमुख, पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत, मानाचे वारकरी हरिभाऊ फुंदे व त्यांच्या पत्नी सुनिता फुंदे इत्यादी उपस्थित होते. मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते पहाटे अडीचच्या सुमारास श्री विठ्ठलाची महापूजा झाली. प्रारंभी श्री विठ्ठलाच्या महापूजेस सुरवात करण्यात आली. राज्यातील कानाकोपर्‍यातून आलेले लाखो वारकरी आषाढ शुद्ध एकादशीनिमित्त विठ्लाच्या दर्शनासाठी पंढरपूरात दाखल झाली असून, जात, धर्म, भाषा, द्वेष, मत्सर या पलीकडे जाऊन सर्व लोक एकमेकांना माउली-माउली ची हाक देतांना दिसून येत आहे. लाखो भाविकांच्या मांदियाळीत विठू नामाच्या जयघोषाने अवघी पंढरी दुमदुमली आहे.
वारकरी प्रतिनिधीचा मान नगरला 
आषाढी एकादशी दिवशी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते श्री विठ्ठल रुक्मिणीची महापूजा करताना मंदिराच्या बाहेर रांगेत उभा असलेल्या एका दांपत्यास वारकरी प्रतिनिधी म्हणून महापूजेमध्ये सहभागी होण्याचा मान दरवर्षी दिला जातो. यंदा हा मान अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील मौजे फुंदे टाकळी येथील माजी सैनिक हरिभाऊ फुंदे व त्यांच्या पत्नी सुनीता फुंदे यांना मिळाला. मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांच्या हस्ते फुंदे दांपत्याचा श्री विठ्ठल रुक्मिणीची प्रतिमा व एस.टी चा एक वर्ष मोफत प्रवासाचा पास देऊन सत्कार करण्यात आला.