Breaking News

बंगाल वॉरियर्स तेलगू टायटन्स सामना बरोबरीत

कोलकाता, दि. 19 - प्रो कबड्डी लीगमध्ये सोमवारी झालेल्या सामन्यात बंगाल वॉरियर्स आणि तेलगू टायटन्स सामना बरोबरीत सुटला. पहिल्या दहा मिनिटांत लोण पत्करूनही जँग कुन लीच्या अप्रतिम खेळाच्या जोरावर जबरदस्त पुनरागमन करणार्‍या बंगाल वॉरियर्सला बरोबरीवर समाधान मानावे लागले. 40 व्या मिनिटाला 34-33 अशा एका गुणाच्या आघाडीवर असलेल्या बंगालच्या कुन लीने पकड करण्यासाठी दाखवलेली घाई महागात पडली. राहुल चौधरीने अखेरच्या चढाईत जान कुन ली याला बाद करून तेलुगू टायटन्सला बरोबरी साधून दिली. या निकालामुळे बंगालचे स्पर्धेतील आव्हान जवळपास संपुष्टात आले
आहे.
तेलुगू टायटन्सने 11 व्या मिनिटाला लोण चढवत बंगालवर 13-6 अशी आघाडी घेतली. राहुल चौधरी, निलेश साळुंके व संदीप नरवाल यांनी चढाई आणि पकडीत सातत्यपूर्ण खेळ करत पहिल्या सत्रात 19-14 असे वर्चस्व राखले. दुसर्‍या सत्रात मात्र जँन कुन लीचा झंझावत अनुभवायला मिळाला. जिम्नॅस्टिकपटूला लाजवेल अशा कसरतींचे प्रदर्शन घडवत तेलुगू टायटन्सची बचावफळी भेदली. कुन लीने 16 चढायांमध्ये 3 बोनस आणि 11 गुण, तर पकडीतही दोन गुणांची कमाई करत सामना चुरशीचा बनवला.
शेवटीपर्यत रंगलेल्या सामन्यात राहुल चौधरी आणि निलेश साळुंके यांनी चढाईत तेलगू कडून तर जान कुन ली तर नितीन मदने यांनी चढाईत चांगली कामगिरी केली. तसेच पकडीमध्ये तेलगूकडून संदीप नरवाल तर बंगाल कडून विशाल माने यानी चांगली कागिरी केली. अखेरच्या क्षणापर्यंत एकेक गुणाच्या आघाडीने दोन्ही संघ विजयासाठी झटत होते. 40 व्या मिनिटाला बंगालकडे एका गुणाची आघाडी होती आणि तेलुगू टायटन्सच्या अखेरच्या चढाईत त्यांना वेळ मारून न्यायची होती. मात्र राहुलची पकड करण्याच्या नादात कून ली बाद झाला आणि तेलुगू टायटन्सने 34-34 अशी बरोबरी केली. तेलुगू टायटन्सकडून चढाईत राहुल (8) व निलेश साळुंके (10) यांनी दर्जेदार खेळ केला. त्यांना संदीप नरवाल (6) याने अष्टपैलू खेळ करून उत्तम साथ दिली. बंगालकडून विशाल माने याने याने हायफाय पूर्ण केले.