बनावट दारुचा जिल्ह्यात महापूर !
। थेट कारवाई करणे गरजेचे असतांना उत्पादन शुल्कच्या अधिकार्यांची डोळेझाक
अहमदनगर (प्रतिनिधी)। 08 - जिल्ह्यातील सर्वच मार्गावरील अनेक ढाबा व हॉटेलवर बनावट दारु विक्री करणारे रॅकेट कार्यरत आहे.बनावट दारु सर्रास विकली जाते. पोलिसांचे व उत्पादन शुल्क विभागाचे या अवैध विक्रीला अप्रत्यक्ष सहाय्य असल्यानेच राजरोशपणे बनावट दारुची विक्री केली जात असून अनेकांच्या जीवाशी खेळले जाऊन स्वत:चे उखळ पांढरे केल्याचा प्रकार घडत आहे. उत्पादन शुल्कच्या अधिकार्यांनी बनावट दारु विक्री करणार्या ढाबा, हॉटेल, बीअरबार, दारु विक्रेते, यांची तपासणी करुन कार्यवाही करणे गरजेचे आहे. मात्र, जिल्ह्यात कोठेच असा प्रकार दिसत नाही. त्यामुळे जिल्ह्यात बनावट दारुचा महापूर आल्याचे दिसून येते.बनावट दारुच्या विक्रीतून सदर रॅकेट मोठा मलिदा मिळवित आहेत. या दारुमुळे अनेकांचे संसार देशोधडीला लागले आहेत. तर अनेकांना वेगळ्याच आजाराने ग्रासले आहेत. ग्रामीण भागात सर्वाधिक बनावट दारुची विक्री होत आहे. अनेक ठिकाणी विक्रीचे परवाने नसतांना दारु विकली जाते. रात्री सर्वच ढाबे, हॉटेल गर्दीने फुललेले दिसतात. मात्र, रात्रीच्या वेळी दारु उत्पादन शुल्कच्या अधिकार्यांनी छापे टाकल्याचे ऐकविण्यात नाही. उत्पादन शुल्क विभागाने श्रीरामपूर, नेवासा, शेवगाव, पाथर्डी, संगमनेर, कोपरगाव, आदी तालुक्याच्या ठिकाणी स्वतंत्र कार्यालय उघडले आहे. यासाठी निरीक्षकांची नियुक्ती असून मोठा कर्मचारी वर्गही नेमण्यात आलेला आहे. संबंधीत कर्मचार्यांकडे बनावट आणि हातभट्टी दारुची माहितीही आहे. यासंदर्भात अनेक अधिकारी खासगीत याची कबुलीही देतात. मग कर्तव्यावर असतांना कारवाई का करत नाही? या मागचे गौडबंगाल काय. ? असा ही प्रश्न उपस्थित होत आहे. अनेक तालुक्यातील ग्रामीण भागात तालुक्याच्या गावातून बनावट दारु येते. तिची विक्री करणारे रॅकेट कार्यरत आहे. अनेक ठिकाणी गावठी दारु बनविण्याच्या भट्ट्या आहेत. बनावट दारु व कर चुकवून आणलेली दारु या रॅकेटमार्फत जिल्ह्यातील सर्व भागात विक्री केली जाते. हीच दारु चोरट्या मार्गाने बंदी असलेल्या गुजरात राज्याकडे पाठविले जाते. यासाठी खासगी बसेसचा वापरही केला जात असल्याचे यापुर्वी झालेल्या जप्तीच्या कारवाईवरुन दिसून येते. तीन वर्षापुर्वी शहरात नव्याने हजर झालेल्या अधिकार्यांनी परप्रातांत पाठविल्या जाणार्या दारुच्या वाहतुकीवर छापा टाकून मोठी कारवाई केली होती. मात्र, सध्या अशी कोणतीही मोठी कारवाई जिल्ह्यात झाल्याचे चर्चेत नाही.
दारु पिणारा कशाने मरण पावला याची चौकशी कोणी करत नाही. मात्र, तो पिणारा होता, बरा झाला मेला, असे म्हणणारे लोक आहेत. मात्र, या बनावट दारुने अनेकांचे बळी जात आहे. यामध्ये उत्पादन शुल्कच्या अधिकार्यांनी आपले काम चोख बजविण्याचा गरज आहे.
उत्पादन शुल्कचे अधिकारी परवाना नुतनीकरणाच्या नावाखाली जिल्ह्यात फिरत असतांना मोठी वसुली करत असल्याची चर्चा आहे. परमीट नसलेल्या हॉटेल चालकामध्ये याबाबत दबक्या आवाजात नेहमीच चर्चा सुरु असते. उत्पादन शुल्क विभागाचा कर सर्वाधिक कर राज्यशासनाला मिळतो मात्र हा कर वसुल करणार्या अधिकार्यांबाबत शासन योग्य ती भुमिका निभावत नसल्याने अधिकारी अशा कारवायाकडे डोळेछाक करत असल्याचे बोलले जाते. बनावट दारुमुळे अनेकांचे संसार मोडकळीस आले असून उपासमारीला महिला सामोरे जात आहे. अधिकार्याच्या कृपा आर्शिवादाने बनावट दारु विकून घर संस्कार उध्दवस्त करणे चांगले नाही. असा सुर नागरिकांकडून निघत आहे.
गेल्या सहा महिन्यापासून जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये दारुबंदीचे ठराव घेतले जात आहेत. असे असले तरी अधिकार्याच्या नाकार्तेपणामुळे तसेच पेताडाच्या मानसिकतेमुळे व राजकारणाच्या संधी साधूमुळे ठराव धुळ खात पडले आहेत. शेवगाव तालुक्यातील एका गावात महिलांनी दारुबंदी बाजूने मतदान करुन दारुची बाटली आडवी केली. मात्र, पारनेर तालुक्यातील निघोज येथे दारुबंदीसाठी मोठे रामायण झाले. गावातील महिलांची व काही ग्रामस्थांची इच्छा असूनही दारुबंदीसाठी एकमत झाले नाही. मतदान होवूनही ते न्यायालयीन प्रक्रियेत अडकलेत आता राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अहवालानंतरच फेरमतदान होण्याची शक्यता आहे.
जिल्ह्याबरोबरच शहरातही बनावट व कर चुकवून आणलेल्या दारुची विक्री मोठ्या प्रमाणावर सुरु आहे. तक्रारीनंतर फक्त पोलिस खातेच कारवाई करतांना दिसून येते. या बनावट दारुमुळे अनेकांना अर्थडोके दुखी, जुलाब, अंग जड पडणे, पोट दुखी, व नैराश्य असे आजार जडले आहेत. या बनावट दारुचा दारु उत्पादन शुल्कच्या अधिकार्यांनी बंदोबस्त करुन रॅकेट उध्दवस्त करावेत अशी मागणी होत आहे.
