पतसंस्था कर्मचार्यांसाठी प्रशिक्षण अभियान राबवावे
। राजीव गांधी पतसंस्थेत चरेगांवकर व आ.मुरकुटे यांचा सत्कार
अहमदनगर, दि. 08 - कोणत्याही क्षेत्रात काम करताना केवळ मोबदल्याच्या विचार न करता कामाचा आनंद घेतला तर मोठे यश निश्चित मिळते. सहकार क्षेत्रात काम करणार्या कर्मचार्यांनी या क्षेत्रातील कायदे तसेच अन्य बाबींचा अभ्यास केला पाहिजे. पतसंस्था कर्मचार्यांनीही आपल्याकडे कामासाठी आलेल्या प्रत्येकाचे पूर्ण समाधान करण्याची वृत्ती अंगिकारावी. संस्थेप्रती पूर्ण निष्ठा ठेवून स्वत:च्या कामाचे वेळोवेळी मूल्यमापन करायला हवेत. यातूनच कामाचा दुहेरी आनंद मिळून प्रगती होईल, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगांवकर यांनी केले.नगरमधील राजीव गांधी नागरी सहकारी पतसंस्थेच्या सारसनगरमधील मुख्य कार्यालयात आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून चरेगांवकर बोलत होते. याप्रसंगी आ.बाळासाहेब मुरकुटे, पतसंस्थेचे चेअरमन अॅड.उध्दव दुसुंगे, जिल्हा उप निबंधक दाबशेडे, जिल्हा पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष सबाजी गायकवाड, सहाय्यक उपनिबंधक हरिश कांबळे, अॅड.अरूण भालसिंग, अॅड.रणसिंग, अॅड.विजय कदम,अॅड.लक्ष्मण गोरे, मर्चंटस् बॅकेचेे संचालक अनिल पोखरणा, आनंदराम मुनोत, व्हा.चेअरमन बाबासाहेब बांगर, पतसंस्थेचे सरव्यवस्थापक शंकर भोगाडे, पांडुरंग डोके आदी उपस्थित होते. पतसंस्थेच्यावतीने ना.शेखर चरेगांवकर आणि आ.बाळासाहेब मुरकुटे यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
यावेळी मार्गदर्शन करताना चरेगांवकर पुढे म्हणाले की, राजीव गांधी पतसंस्थेच्या उत्कर्षाचे आपण स्वत: साक्षीदार आहोत. पतसंस्थेने अतिशय पारदर्शीपणे काम करून ठेवी वाढवल्या आहेत. यात कर्मचार्यांचा मोठा वाटा आहे. पतसंस्थांनी आपल्या उत्कर्षासाठी कर्मचार्यांना सातत्याने प्रशिक्षित केले पाहिजे. नगर जिल्ह्यातील पतसंस्था कर्मचार्यांसाठी फेडरेशनमार्फत प्रशिक्षण अभियान राबविण्याचे आवाहन त्यांनी केले.
यावेळी आ.मुरकुटे म्हणाले, अॅड.उध्दव दुसुंगे यांनी राजीव गांधी पतसंस्थेचा कारभार सांभाळताना गोरगरीब, तळागाळातील लोकांना पत देण्याचे काम केले आहे. संस्थेच्या प्रगतीसाठी अधिकारी, कर्मचार्यांना सातत्याने प्रेरणा मिळणे आवश्यक असते. ती प्रेरणा देण्याचे काम अॅड.दुसुंगे करीत असतात. चेअरमन अॅड.दुसुंगे यांनी स्वागतपर भाषणात संस्थेच्या वाटचालीची माहिती दिली. ते म्हणाले, पतसंस्थेच्या नगर व नाशिक जिल्ह्यात मिळून 38 शाखा कार्यरत आहेत. पतसंस्थेकडे आजमितीस 157 कोटींच्या ठेवी असून कर्ज वाटप 120 कोटी रुपये इतके आहे. पतसंस्थेच्या मुख्यालयाची इमारत स्वमालकीची असून संस्थेने नेहमीच छोटे व्यावसायिक, शेतकरी यांना कर्ज देउन त्यांना उभे करण्याचे काम केले आहे. संस्थेची कर्ज वसुलीही उत्तम प्रकारे चालू असून भविष्यात संस्थेचा विस्तार करताना अधिकाधिक गरजूंना पतपुरवठा करण्याचा प्रयत्न राहणार आहे. अॅड.दुसुंगे यांनी 1 जुलै 2016 पासून कर्मचार्यांना पगारवाढ लागू होणार असल्याचे जाहीर केले. संजय वामन यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमास पतसंस्थेचे अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
