अटकेच्या भितीने पोलिस अधिकार्यासह तिघे फरारी
सांगली, दि. 17 - उमदी पोलिस ठाण्यात खुनाच्या गुन्ह्यात संशयित म्हणून ताब्यात घेतलेल्या राजशेखर नंदगोंड (रा. इंडी, जि. विजापूर) याच्या आत्महत्त्येप्रकरणी राज्य गुन्हे अन्वेषण (सीआयडी) ने सहायक निरिक्षक गणेश वाघमोडे, उपनिरिक्षक राजाराम चिंचोळीकर, शिपाई प्रदीप रोडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. तिघेजण अटकेच्या भीतीने पसार झाले आहेत. सीआयडीची सांगली, सातारा आणि कोल्हापूरची पथके यांच्या मागावर आहेत.गुलगुंजनाळ (ता. जत) येथे गंगूबाई आमसिद्ध नंदगौंडा (वय 25, धुमकनाळ) या विवाहितेचा खून करुन मृतदेह टाकल्याचा प्रकार 31 मे 2016 रोजी उघडकी
स आला. अनैतिक संबंधाच्या संशयावरुन खून झाल्याचे उमदी पोलिसांच्या तपासात स्पष्ट झाले. मोबाईलवरील कॉल डिटेंल्सवरुन पोलिसांनी गंगूबाई यांचा दीर राजशेखर नंदगोंड याला 4 जून रोजी चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्याच्या नातेवाइकांना ताब्यात घेतल्यानंतर कळवले नाही की स्थानिक पोलिसांनाही कल्पना दिली नाही. संशयावरुन ताब्यात घेतल्यानंतर राजशेखर याला मारहाण केली. त्यानंतर राजशेखर याने पोलिस ठाण्यातील शौचालयाजवळ गळफास घेऊन आत्महत्त्या केली. या प्रकारामुळे उमदी परिसरात खळबळ उडाली. राजशेखर याचे वडील दुंडाप्पा यांनी उमदी पोलिसांवर खुनाचा आरोप केला. पोलिस ठाण्यात संशयिताने आत्महत्त्या केल्यामुळे सीआयडीकडे याचा तपास आला. उपअधिक्षक एन. आर. पन्हाळकर, निरिक्षक गीता बागवडे, कर्मचारी संजय कलगुटगी, विजय चौगुले, श्री. पवार यांच्या पथकाने तपास केला.
सीआयडीच्या प्राथमिक चौकशीत सहायक निरिक्षक गणेश वाघमोेडे, उपनिरिक्षक राजाराम चिंचोळीकर, कर्मचारी प्रमोद रोडे हे दोषी आढळले. तिघांनी राजशेखरला मारहाण करुन आत्महत्त्येस प्रवृत्त केल्याबद्दल उपअधीक्षक पन्हाळकर यांनी उमदी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार तिघांवर गुन्हा दाखल झाला. गुन्हा दाखल होण्याची चाहूल लागताच तिघेजण फरारी झाले आहेत. सीआयडी ची सांगली, सातारा आणि कोल्हापूरची पथके त्यांच्या मागावर आहेत.