साथीच्या आजारांचा चाकणला विळखा; ग्रामीण रुग्णालयात रुग्णांची दुप्पट संख्या
पुणे, दि. 23 - पावसाळा सुरू झाल्यापासून तापाच्या साथीने चाकण पंचक्रोशीत डोके वर काढण्यास सुरुवात केली आहे. चाकण रूग्णालयात बाह्य रुग्ण विभागात येणार्या रुग्णांची संख्या तब्बल दुपटीने वाढली आहे. तसेच काही भागांमध्ये डेंग्यू पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येत असल्याचे वैद्यकीय अधिकारी सांगत आहेत. टायफॉईड ताप मलेरिया व डेंग्यू सदृश्य आजारांच्या उपचारासाठी अनेक रुग्ण चाकण ग्रामीण रुग्णालयात दाखल होत आहेत. सर्दी, खोकला, आमांश, हगवण, उलट्या, कावीळ, विषमज्वर, पोलिओ, सांधेदुखी, मलेरिया या आजारांची लागण या दिवसांत जास्त प्रमा
णात होत असून खूप मोठ्या प्रमाणावर अशा आजारांच्या तक्रारी घेऊन रुग्ण खाजगी आणि सरकारी रुग्णालयात येत असल्यामुळे आरोग्य यंत्रणेची चांगलीच तारांबळ उडाली आहे.
पावसाळा आला की, दरवर्षी रुग्णांच्या संख्येत वाढ होते. परिसरातले दवाखाने हाऊसफुल्ल होतात. रोगराई पसरते यावर घरगुती उपाय न करता, वेळ न दवडता रुग्णाला दवाखान्यात नेऊन डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार करावेत, असे आवाहन चाकण ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी करीत आहेत.
पावसाळा सुरू झाल्यापासून चाकण पंचक्रोशीत सर्वत्र सर्दी, तापाचे रुग्ण उपचारासाठी रुग्णालयात दाखल होत आहेत. पावसाळ्यामध्ये दूषित जलजन्य आजाराप्रमाणेच पावसाळ्यात डासाचे प्रमाण वाढत असल्याने मलेरिया, डेंग्यू सदृश्य आजारांचेही प्रमाण वाढले असून नागरिकांनी दक्षता घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. पावसाळा सुरू झाल्यानंतर साथीच्या आजारांनी डोके वर काढल्याने आरोग्य विभागाने वेळीच लक्ष देऊन सर्वेक्षण करावे, अशी मागणी चाकणसह पंचक्रोशीतील नागरिकांमधून केली जात आहे.
वैद्यकीय अधिकारी म्हणतात...
पावसाळा सर्वांनाच आवडतो. प्रचंड उत्साह व आनंदाचा ऋतू म्हणजे पावसाळा. त्यामुळे अबाल-वृद्धांना पावसाचे खास आकर्षण असते. असे असले तरीही आरोग्याची सर्वाधिक काळजी घेण्याचा ऋतूही पावसाळाच असतो, असे चाकण ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी सांगत आहेत. या ऋतूत पाण्यापासून होणार्या आजारांपासून बचावाची जशी आवश्यकता असते तशीच आवश्यकता असते, ती डासांपासून बचावाची. पिण्याचे पाणी दूषित असल्यास डायरिया, टायफॉईड, कावीळ, मलेरिया, डेंग्यू तसेच अॅलर्जी यासारख्या आजारांची लागण होऊ शकते. तर सर्दी, खोकला व तापाची लागण होण्याचीही दाट शक्यता असते, त्यामुळे नागरिकांनी दक्षता घ्यावी आणि आजार अंगावर काढण्यापेक्षा तात्काळ डॉक्टरांना भेटावे, असे आवाहन करण्यात येत आहे.