Breaking News

बंद हॉटेलमध्ये केली तरुणाची हत्या

औरंगाबाद, दि. 18 - एका 30 वर्षीय व्यक्तीचे तोंड व हात चिकटपट्टीने घट्ट चिकटवून, डोक्यात गोळी झाडून त्याचा खून करण्यात आल्याचा प्रकार शिऊर जवळील हॉटेल साईप्रसाद मध्ये उघडकीस आला.
वैजापूरˆऔरंगाबाद मार्गावरील शिऊर पासून तीन किमी अंतरावर अ
सलेले हॉटेल साईप्रसाद हे गेल्या कित्येक महिन्यांपासून बंद आहे. या बंद अवस्थेत असलेल्या हॉटेलचा फायदा घेत एका अनोळखी तीस वर्षीय इसमास अर्धनग्न करून त्याचे तोंड व हात चिकटपट्टीने घट्ट चिकटवून त्याची डोक्यात गोळी झाडून हत्या करण्यात आली. साफियाबाद येथील नितीन जाधव यांची शेतजमीन याच परिसरात असल्याने त्यांनी या हॉटेलमध्ये सहज डोकावून पाहिले असता त्यांना ही बाब निदर्शनास आली. त्यांनी तातडीने साफियाबादवाडीचे पोलीस पाटील अशोक जाधव, संताराम जाधव यांना या प्रकाराची माहिती दिली. अशोक जाधव यांनी ही माहिती शिऊर पोलिसांना कळवताच शिऊर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान सहाय्यक पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी घटनास्थळी धाव घेत झालेल्या घटनेची माहिती घेतली व पंचनामा केला. मृत इसम अनोळखी असून खून कोणत्या कारणासाठी करण्यात आला या बाबत शिऊरसह परिसरात उलट सुलट चर्चेला उधान आले आहे. या अनोळखी इसमास निर्मनुष्य ठिकाणी अर्धनग्न करून खून करण्याचा कट हा पूर्वनियोजित असल्याची चर्चा घटनास्थळी चर्चीली जात होती. महामार्गावरच असलेली ही हॉटेल गेल्या कित्येक दिवसापासून बंद आहे तर हा परिसर निर्मनुष्य आहे. हॉटेल च्या पाठीमागील बाजूच्या दरवाजाने हॉटेल मध्ये प्रवेश करून या इसमाचे तोंड व हात चिकटपट्टी ने घट्ट आवळून त्याच्या डोक्यात गोळी झाडण्याचा कट पूर्वनियोजित होता.