Breaking News

खड्ड्यांसंदर्भात काँग्रेसतर्फे ऑनलाईन फोटो मोहीम

मुंबई, दि. 06 - मुंबईत पाऊस पडून दहा दिवस ही झाले नाही तर मुंबईतील रस्त्यांची अवस्था दयनीय झालेली आहे. पहिल्याच पावसात मुंबईतील रस्त्यांवर  खड्डेच खड्डे निर्माण झाले असून खड्डयात रस्ते की रस्त्यात खड्डे, असा प्रश्‍न मुंबईकरांना दरवर्षीच पडतो. मुंबई महापालिकेचा रस्त्यातील भ्रष्टाचार समोर आला  असून खड्डयांचे वास्तव मुंबईकरांसमोर आणण्यासाठी मुंबई काँग्रेसतर्फे ऑनलाईन फोटो चळवळ ‘बोल मेरे पॉटहोल बोल’ मोहीम राबवण्यात येत आहे. जिथे जिथे  खड्डे दिसतील तेथील फोटो काढून आम्हाला व्हॉट्सअ‍ॅप, ई-मेल किंवा ट्विटर करावेत. प्रत्येक नागरिकाने आपापल्या विभागातील खड्ड्यांचे फोटो आम्हाला  ताबडतोब पाठवावेत, असे आवाहन मुंबई काँग्रेसतर्फे करण्यात आल्याचे मुंबई अध्यक्ष संजय निरुपम यांनी सांगितले.
रस्त्यांची दाणादाण उडालेली असून त्यामुळे संपूर्ण मुंबईभर प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. दरवर्षी पावसात सर्व मुंबईकरांचे असेच हाल होतात. यासाठी  शिवसेना-भाजपा सरकार काहीही करत नसून रस्त्यांची चाळण होण्यास महापालिकेतील सत्ताधारी शिवसेना-भाजपाच जबाबदार आहे, असा आरोपही निरुपम  यांनी केला आहे. मुंबई महानगरपालिकेत शिवसेना- भाजपाची सत्ता असून मुंबई महानगरपालिकेचे रस्त्यांचे बजेट दरवर्षी 3500 हजार कोटींचे असते. तर रस्ते  दुरुस्तीचे बजेट 2500 हजार कोटी रुपयांचे असते. शिवसेना आणि भाजपा फक्त यामध्ये भ्रष्टाचार करण्यात गुंतलेले आहेत. पैसा खाण्यात ते मग्न आहेत. म्हणून  मुंबई काँग्रेसने पुढाकार घेऊन खड्डयांसंदर्भात ऑनलाईन फोटो चळवळ ‘बोल मेरे पॉटहोल बोल’ सुरू केली आहे.