Breaking News

तळई येथे वायरमन नसल्याने वीज ग्राहकांची गैरसोय

जळगाव, दि. 10 - येथे ग्रामप्रशासनाच्या माहितीनुसार 2 वायरमन पदाच्या जागा मंजूर असून यापूर्वी फक्त 1 वायरमनची नेमणूक करण्यात आलेली होती. अगोदर असलेले वायरमन अमर पाटील यांची गेल्या 2 महिन्यापूर्वी बदली झाली असल्याने वायरमन पद रिक्त असून त्या जागेवर अजून पर्यंत नेमणूक केलेली नाही. त्यामुळे ग्रामस्थांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.
उत्राण येथे वीज उपकेंद्र असून येथून तळईला विद्युत लाईन जोडलेली आहे. ऐन पावसाळ्याच्या दिवसांवर रात्री अपरात्री विद्युत पुरवठा खंडीत झाल्यास येथे वायरमन उपलब्ध नसल्याने प्रसंगी नागरिकांना अंधारात रहावे लागत आहे. विविध विद्युत समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. गावामध्ये लाईन कनेक्शन जोडणे, खांबावरील स्ट्रीट लाईट लावणे, नवीन मीटर बसविणे, काढणे तसेच वीज बिलांच्या तक्रारी वाढल्या असून अशाप्रकारची विद्युत कामे रखडलेली आहेत. त्यामुळे विद्युत कंपनीने ग्रामस्थांची होणारी गैरसोय थांबविण्यासाठी लवकरात लवकर वायरमन यांची रिक्त पदे भरावीत, अशी मागणी ग्रामस्थांतर्फे करण्यात येत आहे.