Breaking News

वीज भारनियमनातून सावेडीकरांची होणार सुटका

 । मनपाने जागा दिल्याने प्रश्‍न लागला मार्गी । सावेडीत महावितरणचे उपकेंद्र

 अहमदनगर (प्रतिनिधी)। 01 - महापालिकेने घातलेल्या अटी वगळून तपोवन रस्त्यावरील जागा उपकेेंद्रासाठी देण्याबाबतचे पत्र महावितरणला दिले आहे. त्यामुळे उपकेंद्राद्वारे सावेडी परिसरात सुमारे 5 ते 6 हजार नवीन वीज जोड देण्यात येणार असून तातडीच्या भार नियमनातून सावेडीकरांची सुटका होणार आहे. मनपाने जागा दिल्याने हा प्रश्‍न लवकर मार्गी लागणार आहे. सदर जागेवर महावितरणचे उपकेंद्र होणार आहे. 
सावेडी उपकेंद्राचा गेल्या अनेक वर्षापासून प्रश्‍न भिजत पडला होता. मागणी करुनही उपकेंद्र सुरु करण्याच्या कामाला मुहुर्त लागत नव्हता. नुकतीच महापालिकेने उपकेंद्रासाठी जागा देण्याची तयारी दर्शविली आहे. उपकेंद्र सुरु झाल्यावर वीज भार नियमनाची समस्या सुटणार आहे.
सावेडी परिसराला एमआयडीसी उपकेंद्रातून सध्या वीज पुरवठा सुरु आहे. सावेडी परिसराची दिवसेंदिवस वाढ होत असल्याने एमआयडीसी उपकेंद्रावर भार पडत आहे. त्यामुळे सावेडी परिसरातील अनेक भागात कमी दाबाने वीज पुरवठा होत आहे. वारंवार वीज खंडीत होण्याचे प्रकारही होत आहेत. या भागात कायमच तातडीचे भार नियमन करण्यात येते. अनेक वेळा बिघाड झाल्यास 12 ते 24 तास वीज पुरवठा खंडीत होतो. वारंवार खंडीत होणार्‍या वीज पुरवठ्यामुळे वीज वितरण कर्मचार्‍यांना नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागते. त्यामुळे सावेडी भागासाठी स्वतंत्र उपकेंद्र सुरु करण्यात यावे. अशी मागणी गेल्या अनेक वर्षापासून उपनगरातील नागरिकांनी केली आहे.
सावेडीसाठी केंद्र सरकारच्या आरएपीडी व आयपीडीएस योजनांतून 3 उपकेंद्रांना निधी मिळालेला आहे. मात्र, जागा मिळत नसल्याने उपकेंद्राची कामे सुरु होण्यास अडचणी होत्या. महावितरणच्यावतीने महानगरपालिकेकडे जागेच्या मागणीचा प्रस्ताव देण्यात आला होता. त्यासाठी महावितरण व महानगरपालिकेच्या अधिकार्‍यांनी विविध जांगाची पाहणी ही केली होती. मात्र त्यावर कोणताच निर्णय होत नव्हता, त्यामुळे सावेडी उपकेंद्राचे काम रेगांळले होते. महावितरण कंपनीच्या अधिकार्‍यांनी उपकेंद्राच्या जागेसाठी महापालिकेला पैसे देण्याची तयारी दर्शविली होती. मात्र, जागा देतांना महापालिकेकडून काही अटी पुढे करण्यात आल्या होत्या. महापालिकेच्यावतीने जागा विकत देण्याची तसेच त्याबदल्यात कचरा टेपोतील प्रकल्पासाठी मोफत वीज देण्याची अट घालण्यात आली होती. महावितरणला सदर अट मान्य नसल्याने सदर प्रस्ताव प्रलंबित होता. महापालिकेने घातलेल्या अटी मान्य झाल्याशिवाय महापालिका जागा देण्यास तयार नव्हती. त्यामुळे सावेडी उपकेंद्राबाबत प्रश्‍न निर्माण झाला होता. मात्र, आता महापालिकेने घातलेल्या अटी मागे घेतल्या आहेत. तसेच उपकेंद्रासाठी तपोवन रस्त्यावरील जागा देण्याची तयारी दर्शविली आहे. तसे पत्र महावितरणला मिळाल्याची माहिती अधिक्षक अभियंता कोळी व कार्यकारी अभियंता चव्हाण यांनी दिली. महापालिकेकडूून सदर जागा ताब्यात आल्यावर त्वरीत निविदा प्रक्रिया राबवून उपकेंद्र उभारण्यात येणार आहे. तसेच सदर उपकेंद्र झाल्याने तातडीच्या भार नियमनातून सावेडीकरांची सुटका होणार आहे.