अतिसार नियंत्रण पंधरवाडा व जागतिक लोकसंख्या दिन कार्यक्रमाचा
पांडूरंग खेडेकरांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ
बुलडाणा, दि. 14 - प्राथमिक आरोग्य केंद्र आटोळ येथे अतिसार नियंत्रण व जागतिक लोकसंख्या दिन या दोन्ही कार्यक्रमाचे जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा आरोग्य विषय समिती सभापती पांडूरंग खेडेकर यांनी सोमवार 11 जुलै रोजी हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ केला.जिल्ह्यात 11 ते 23 जुलै दरम्यान अतिसार नियंत्रण पंधरवाड्यानिमित्त 0 ते 5 वर्षाखालील बालकांना अतिसार /जुलाब या आजारापासून सुरक्षित करण्यासाठी ओआरएस पावडर व अतिसाराने आजारी असलेल्या बालकांना झिंक गोळयांचे आशा स्वयंसेविका, आरोग्य कर्मचारी यांच्यामार्फत घरोघरी जावून वाटप करण्यात येणार आहे. तसेच जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त लोकसंख्या नियंत्रणासाठी कुटुंब नियोजन, पाळणा लांबविण्याकरीता निरोधचा वापर, गर्भ निरोधक गोळयाचा वापर तसेच पी.पी.आय.सी.डी.बाळंतपणानंतर तीन ते चार महिन्यात गर्भधारणा होऊ नये म्हणून लगेचच तांबी बसवून घेण्याबाबत कार्यक्रम राबविण्याचे नियोजन करण्यात आल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.शिवाजी पवार यांनी सांगितले. तर उपस्थित शालेय विद्यार्थ्यांना ओआरएस पावडरचे मिश्रण तयार करणे व स्वच्छतेचे महत्व पटवून देण्यात आले. तरी 0 ते 5 वर्ष वयोगटातील बालकांच्या पालकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जि.प. उपाध्यक्ष पांडुरंग खेडेकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजी पवार यांनी यावेळी केले.
याप्रसंगी शेलगाव आटोळ ग्रा.पं.सरपंच भुजंगराव आटोळे, डॉ.रविंद्र गोफण, जिल्हा आरसीएच अधिकारी, चिखली तालुका आरोग्य अधिकारी डॉ.ईमरान खान, मलकापुर तालुका आरोग्य अधिकारी डॉ.सावजी, डॉ.चित्ते, प्रा.आ.केंद्र शेलगाव आटोळ डॉ.वायाळ, आर.बी.जाधव यासह आदी आरोग्य अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
