कासेगावात चोरट्यांचा 5 ॥ लाखावर डल्ला
सांगली, दि. 12 - येथील मध्यवर्ती ठिकाणी राहणारे जयवंत लालासाहेब पाटील यांच्या घरातून साडेपाच लाख रुपयांचा ऐवज चोरट्यांनी पळवला. त्यामध्ये रोख रक्कम आणि सोन्याच्या दागिन्यांचा समावेश आहे. पाटील कुटुंबीय विवाह समारंभाच्या गडबडीत व्यस्त असताना हा प्रकार घडला. रात्री उशिरा कासेगाव पोलिसांत जयवंत पाटील यांनी फिर्याद दिली.जयवंत पाटील यांच्या घरी विवाह समारंभ होता. त्यांच्या मुलीचा विवाह एका मंगलकार्यालयात सायंकाळी चार वाजता होता. विवाहासाठी पाटील परिवार घराला कुलूप लावून कार्यालयाकडे गेले. घरी कोणी नसल्याचे पाहून चोरट्याने घरात ठेवलेली पैशाची बॅग व कपाटातील सोने असा ऐवज पळवला. भरवस्तीत असलेल्या पाटील यांच्या घरी चोरी झाल्याची माहिती कोणालाही समजली नाही. पाटील कुटुंबीय विवाह आटोपून घरी आल्यानंतर चोरी झाल्याचा प्रकार लक्षात आला. दिवसभर सुरु असलेला पाऊस आणि पाटील यांचे शेजारी व गल्लीतील सर्वजण विवाहासाठी गेल्याचा फायदा चोरट्यांनी उठवल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला.
