भिवंडीत गोशाळेवर दरोडा; 4 कामगार जखमी
ठाणे, दि. 22 - भिवंडी तालुक्यातील पाये येथील गोशाळेवर दरोडा टाकून कामगारांवर तलवारीने वार करत पैसे लुटल्याची घटना घडली. या घटनेमुळे गोशाळेतील कामगारांमध्ये भीतीचे वातावरण असून, ते पलायनाच्या तयारीत असल्याचे समजते. मदनमोहन हुकूमसिंग बृजवासी (34), निरज बगाडिया, मोहन सिंग, धर्मेंर्द्र ठाकुर असे दरोडेखोरांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या कामगारांची नावे आहेत. या कामगारांवर मुंबईच्या जीपी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असून, दोघांची प्रकृती चिंताजनक आहे.भिवंडी तालुक्यातील पाये गावात गेल्या 4 वर्षांपासून तुळशी गोवर्धन ट्रस्ट फाऊंडेशन, मुंबई यांच्या वतीने गोशाळा चालवली जात आहे. यात 450 गायी आहेत. गोशाळेतील कामगार गाईंना चारा घालत असताना येथील स्थानिक रहिवाशी उमेश मुकादम याने 8 ते 9 साथीदारांसह हातात तलवारी आणि काठ्या घेऊन त्यांच्यावर हल्ला केला. यावेळी हल्लेखोरांनी कामगारांचे 15 हजार रुपये लुटून नेल्याचे कामगारांनी पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटले आहे.