Breaking News

वाकड व हिंजवडी येथील 42 लाखांच्या रॉबरीचे गुन्हे उघडकीस; 5 जण अटकेत

पुणे, दि. 15 - वाकड ब्रीज हिंजवडी येथे मागील वर्षी दिवाळीच्या सुमारास 23 लाखांची आणि वाकड वाय जंक्शन येथे 19 लाखांची जबरी चोरी करणार्‍या 5 आरोपींना गुन्हे शाखा युनिट 4 च्या पोलिसांनी अटक केली आहे. 
निलेश भाऊसाहेब कोळपे (वय 31, रा. वाल्हेकरवाडी), वाल्मीक विरा कोळपे (वय -30, रा. वाल्हेकरवाडी), हेमंत जयवंत भगवंत चितळकर (वय, 29, रा. वाल्हेकरवाडी),
संतोष भिमराव पाटोळे (वय- 24, चिंचवडेनगर) आणि आणखी एक साथीदार अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांना त्यांच्या बातमीदारामार्फत वाकड ब्रीज येथील जबरी चोरीतील आरोपी निलेश भाऊसाहेब कोळपे चिंचवड येथे येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार त्याचा शोध घेऊन कोळपे यास चिंचवड येथून अटक केली. सलग 12 तास त्याची कसून चौकशी केली असता त्याने वाल्मीक विरा कोळपे याचे नाव सांगितले. वाल्मीक कोळपे याचा शोध घेऊन पोलिसांनी त्याची चौकशी केली असता त्यांनी मागील वर्षी वाकड ब्रीज येथून आपल्या साथीदारांसह मिळून दुचाकीवरून जाणार्‍या दोन इसमांना कोयत्याने मारहाण करून त्याच्या हातातील 23 लाख रुपयांची बॅग हिसकावून नेल्याचे मान्य केले.
त्याने दिलेल्या साथीदारांच्या माहितीनुसार गुन्हे शाखेच्या पोलिसांनी त्यांचा शोध घेऊन हेमंत जयवंत भगवंत चितळकर (वय, 29, रा. वाल्हेकरवाडी), संतोष भिमराव पाटोळे (वय- 24, चिंचवडेनगर) आणि आणखी एक साथीदार यांना अटक केली. चौकशीत त्यांनी इतर ठिकाणचे मिळून तब्बल 19 लाख रुपयांची जबरी चोरी केल्याचे तपासात उघडकीस आले.
आरोपींना पोलिसांनी शिवाजीनगर न्यायालयात हजर करून न्यायालयाने 15 जुलैपर्यंत पोलीस कोठडी रिमांडमध्ये ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या कारवाईत पोलिसांनी गुन्ह्यात वापरण्यात आलेली बुलेट, बजाज पल्सर, स्प्लेंडर गाड्या, कोयता तसेच 5 लाख 90 हजार रुपयांची रोख रक्कम अडीच लाख रुपयांचे सोन्याचे घड्याळ जप्त करण्यात आले आहे.
ही कारवाई साहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन भोयर, गणेश पाटील आदींच्या टीमने केली. पोलीस अधिक तपास करीत आहेत.