352 कोटींच्या रस्ते घोटाळाप्रकरणी
मुंबई महापालिकेच्या दोन अभियंत्यांना अटक
मुंबई, दि. 07 - मुंबई शहरातील 14 तर उपनगरातील 20 रस्त्यांच्या बांधणी संदर्भातील 352 कोटी रुपयांच्या रस्ते घोटाळ्याच्या तपासासाठी तयार करण्यात आलेल्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) गुरूवारी महापालिकेच्या दोन अभियंत्यांना अटक केली आहे. अशोक पद्मसिंग पवार(57) आणि उदय नामदेव मुरूडकर(54) अशी अटक करण्यात आलेल्या पालिकेच्या अभियंत्यांची नावे आहेत. दोघेही पालिकेचे मुख्य अभियंते आहेत.याआधी पोलिसांनी 10 लेखानिरीक्षकांना अटक केली आहे. मुंबईतील रस्त्यांमधील अनियमिततेची
चौकशी करण्याची मागणी महापौर स्नेहल आंबेकर यांनी आयुक्तांना पत्राद्वारे केली होती. त्याद्वारे केलेल्या प्राथमिक चौकशीत रस्त्यांच्या कामात 34 ते 100 टक्क्यांपर्यंत घोळ आढळला. संबंधित सहा कंत्राटदारांवर पोलिसांत गुन्हे दाखल झाले असून पोलिसांनी अटकसत्रही सुरू केले आहे. अभियंत्यांना अटक करण्यासाठी पोलिसांनी त्यांच्या घरावर नजर ठेवावी लागत आहे. घोटाळ्यात अटक झालेले अभियंते हे काही सराईत गुन्हेगार नाहीत. त्यातील बहुतेक तर वर्ष-दोन वर्षांपूर्वी कामाला लागलेले असून अल्पावधीतच घोटाळ्याच्या सर्व प्रक्रियांना सरावल्याचे दिसून आले आहे, असे एसआयटीमधील एका अधिकार्याने सांगितले. अटक होणार हे माहित असल्याने हे अभियंते दिवसा घरी येण्याचे टाळत आहेत. तसेच, काहीजणांनी आपल्या मित्र, नातेवाईकांकडे आसरा घेतला आहे.
