Breaking News

पंतप्रधान पीक विमा योजनेसाठी 31 जुलै अंतिम मुदत

। पीक विमा योजनेत सहभागी होण्याचे शेतकर्‍यांना आवाहन 

अहमदनगर (प्रतिनिधी) । 10 - पंतप्रधान पीक विमा योजना खरीप हंगामात लागू करण्यात आली असून, या योजनेत सहभागी होण्यासाठी 31 जुलैपर्यंत अंतिम मुदत देण्यात आली आहे. या योजनेंतर्गत भात, खरीप ज्वारी, बाजरी, नाचणी, मका, तूर, मूग, उडिद, सोयाबीन, भुईमूग, तीळ, सूर्यफूल, कारळा, कापूस आणि खरीप कांदा या पिकांसाठी विमा संरक्षण प्राप्त होणार आहे. 
वास्तवदश्री दराने विमा हप्ता आकारण्यात येणार असून, शेतकर्‍यांवरील भार कमी करण्यासाठी खरीप हंगामात शेतकर्‍यांनी भरावायाचा विमा हप्ता केवळ दोन टक्के, तर रब्बी हंगामासाठी दीड टक्का आहे. नगदी पिकासाठी विमा हप्ता पाच टक्के आहे. कर्जदार शेतकर्‍यांना अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी ही योजना बंधनकारक असून, बिगर कर्जदार शेतकर्यांना ऐच्छिक आहे.
योजने अंतर्गत पीक पेरणीपासून काढणीपर्यंतच्या कालावधीत नैसर्गिक आग, वीज कोसळणे, गारपीट, चक्रीवादळ, पूर, दुष्काळ, भूस्खलन, पावसातील खड, कीड व रोग आदी बाबींमुळे पिकांच्या उत्पा
दनात येणारी घट जोखमीच्या बाबींमध्ये समाविष्ट केलेली आहे.
हवामान घटकाच्या प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांची पेरणी किंवा लावणी न झाल्यामुळे होणारे नुकसान, पिकांचे काढणी पश्‍चात होणारे नुकसान, तसेच स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे होणार्‍या नुकसानीसाठीदेखील या पीक विम्याचे संरक्षण मिळणार आहे. जिल्ह्यातील सर्व प्रमुख अन्नधान्य, गळितधान्य आणि नगदी पिकांचा समावेश या योजनेत करण्यात आल्यामुळे जास्तीत जास्त शेतकर्‍यांनी आपल्या पिकासाठी विमा संरक्षण करावे. अधिक माहितीसाठी तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी  यांनी केले आहे.