Breaking News

सातारा जिल्ह्यासाठी 261.30 कोटींच्या आर्थिक नियतव्ययास मंजुरी

सातारा, दि.17 (प्रतिनिधी) - सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनेच्या सन 2016-17 साठी 261.30 कोटींच्या आर्थिक नियतव्ययास जिल्हा नियोजन समितीतच्या सभेत मंजुरी दिली. अध्यक्षस्थानी पालकमंत्री विजय शिवतारे हे तर पशुसंवर्धन, दुग्धविकास, मत्स्य व्यवसाय मंत्री महादेव जानकर हे प्रमुख उपस्थित होते.
सातारा जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात झालेल्या बैठकीस जिल्हा परिषदेचे अध्यक्ष सुभाष नरळे, आमदार प्रभाकर घार्गे, आमदार बाळासाहेब पाटील, आमदार जयकुमार गोरे, आमदार मकरंद पाटील, आमदार दीपक चव्हाण, आमदार शंभुराज देसाई, आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार आनंदराव पाटील, जिल्हाधिकारी अश्‍विन मुद्गल, मुख्य कार्यकारी अधिका
री डॉ. राजेश देशमुख, पोलीस अधीक्षक संदीप पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी संजीव देशमुख, जिल्हा नियोजन अधिकारी हणमंत माळी, समाज कल्याणचे सहायक आयुक्त रवींद्र कदम-पाटील उपस्थित होते.
सभेच्या सुरुवातीला ना. जानकर यांचे जिल्हाधिकारी मुद्गल यांनी पुस्तक, लोकराज्यचा अंक आणि रोप देवून स्वागत केले. तसेच यावेळी नूतन सदस्यांचेही पुस्तक, लोकराज्यचा अंक आणि रोप देवून स्वागत करण्यात आले. जिल्हा नियोजन अधिकारी माळी यांनी विषय पत्रिकेचे वाचन केले. तर जिल्हाधिकारी मुद्गल यांनी प्रास्ताविक केले.
आजच्या या बैठकीत अनुसूचीत जाती, विशेष घटक योजना सन 2016-17 च्या 70.54 कोटी आराखड्यास, आदीवासी उपयोजना 177.27 लाख आराखडा सादर करण्यात आला. अनुसूचित जाती उपयोजनेसाठी सन 2015-16 या आर्थिक वर्षामध्ये 6244 लक्ष नियतव्यय मंजुर आहे. त्यापैकी 6144 लक्ष निधी अर्थसंकल्पीत झाला आहे. या तरतुदीपैकी 5449.98 लक्ष खर्च झालेला आहे. खर्चाचे प्रमाण प्राप्त तरतुदीशी 95.51 टक्के आहे, अशी माहिती कदम-पाटील यांनी यावेळी दिली. सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजना पुनर्विनियोजन प्रस्तावास व खर्चास यावेळी मान्यता देण्यात आली. नाविन्यपूर्ण योजनेंतर्गत जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयास ड्रोन खरेदीसाठी मान्यता देण्यात आली. त्याचबरोबर मौजे शिंगणापूर ता. माण येथील मुंगी घाटाचा 8.28 लक्षचा परिपूर्ण प्रस्तावासही मान्यता देण्यात आली. यात्रा स्थळांच्या विकासासाठी क वर्ग तिर्थक्षेत्र मिळणेबाबत मौजे साजुर ता. कराड येथील महादेव मंदिर, मौजे रेठरे खुर्द ता. कराड येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर आणि मौजे कोरेगाव येथील केदारेश्‍वर मंदिर प्रस्तावास मान्यता देण्यात आली.
जलयुक्त शिवार अभियानांतर्गत झालेल्या निकृष्ट कामांबाबत सदस्य दिपक पवार यांनी सभागृहात तक्रार केली.
त्याबाबत जिल्हाधिकारी मुद्गल म्हणाले, या कामांची मी स्वत: पहाणी करतो आपण त्याबाबत सविस्तर माहिती द्यावी. जलयुक्त शिवारच्या कामांबाबत तपासणीसाठी नऊ त्रयस्त यंत्रणांची नेमणूक करण्यात आली आहे. त्याचबरोबर आमदार गोरे यांनीही मोठा भ्रष्टाचार झाल्याचे सांगितले. त्याबाबतही पुरावे सादर करावे संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल, असे आश्‍वासन मुद्गल यांनी दिले.
पालकमंत्री शिवतारे यांनी यावेळी कृषी विभागाने सदस्यांच्या आरोपांची खातरजमा करावी. त्याचबरोबर संबंधितांकडून लेखी खुलासे घ्यावेत आणि तथ्य आढळल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, त्याचबरोबर जिल्हा परिषदेच्या बैठकांना आपण उपस्थित राहत चला, अशा सूचना जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जितेंद्र शिंदे यांना केल्या. पालकमंत्री शिवतारे पुढे म्हणाले, पाणी पुरवठा योजनांबाबत सविस्तर माहिती सादर करावी. तसेच शहरातील ओढ्यांवर झालेल्या अतिक्रमणाबाबत सर्वेक्षण करा, पुढे अतिक्रमण होणार नाही याचीही दक्षता घ्या. लोकप्रतिनिधींना विश्‍वासात घेवून त्यांना संपर्क करुनच अधिकार्‍यांनी कामांचे प्रस्ताव तसेच बदल सादर करावेत. या सभेत आमदार शंभुराज देसाई, आमदार दीपक चव्हाण, आमदार जयकुमार गोरे, आमदार प्रभाकर घार्गे, सदस्य डॉ. दिलीप येळगावकर, अ‍ॅड भरत पाटील आदींनी चर्चेत सहभाग घेतला.