Breaking News

कोयना प्रकल्पातील 14 गावे सुविधांपासून वंचित

सातारा, 11 - (प्रतिनिधी : कोयना प्रकल्पाच्या महाबळेश्‍वर आणि पाटण तालुक्यातील एकूण 14 गावे गेल्या 22 वर्षांपासून मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत. याविरोधात येत्या 2 ऑगस्ट रोजी अखिल कोयना पुनर्वसाहत सेवा संघाच्या वतीने आझाद मैदानात एकदिवसीय आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती संघाचे अध्यक्ष विजय मोरे यांनी दिली.
शिंडी, वलवण, चकदेव, पर्वत, आराव, मोरणी, म्हाळुंगे आणि उचाट, वाघावळे, लामज, निवळी, आकल्पे, पिंपरी, पाटण तालुक्यातील पर्वत आदी गावांचा यात समावेश आहे. रस्ते नाहीत, दळवळणाचे साधन नाही. या 14 गावांचे क्षेत्र अभयारण्यात वगळले आहे. यामुळे राष्ट्रीय वन्यजीव विभागाच्या निर्णयाची भर पडणार आहे. अभयारण्य क्षेत्रात सायंकाळी 5 ते सकाळी 8 या कालावधीत फिरण्यावर बंदी घालण्यात येणार आहे. रात्री बाहेर पडायचे झाल्यास वन विभागाचा पास गळ्यात अडकवावा लागणार आहे. तसेच वाहनांचा वेग कमी ठेवावा लागेल. मोटार वाहने अभयारण्याच्या क्षेत्रात उभी करता येणार नाहीत. या संदर्भात 4 ऑगस्ट 2014 रोजी तत्कालीन मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले होते. संबंधित ग्रामपंचायतीचे ठराव, महाबळेश्‍वर तालुका पंचायत समिती आणि सातारा जिल्हा परिषदेकडून मंजूर केलेल्या ठरावांच्या प्रती सादर करण्यात आल्या होत्या, परंतू यावर कोणत्याही प्रकारच्या हालचाली शासनाने केल्या नाहीत. दरम्यान, लोकांच्या मूलभूत हक्कांंची पायमल्ली होत आहे. या विरोधात येत्या 2 ऑगस्ट रोजी आझाद मैदानावर न्यायासाठी 14 गावातील ग्रामस्थ एका दिवसाचे लाक्षणिक धरणे आंदोलन करणार असल्याचे विजय मोरे यांनी सांगितले.