Breaking News

प्रो कबड्डी लीग : पाचव्या हंगामात 12 संघ

हैदराबाद, दि. 31 - प्रत्येक हंगामात यशस्वी वाटचाल करणार्‍या प्रो कबड्डी लीगमध्ये आता 8 ऐवजी 12 संघ सहभागी होण्याची शक्यता पुढील म्हणजे 2017 च्या पाचव्या हंगामात लीगचे स्वरूप बदलण्याचा विचार तसेच स्पर्धेचा कालावधी वाढवण्याच्या संयोजकांचा विचार आहे. असे विश्‍वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीवरून समजले आहे. 
“प्रो कबड्डीच्या प्रत्येक हंगामाला अप्रतिम प्रतिसाद मिळाला आहे. स्पध्रेची व्याप्ती वाढवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. त्यामुळे लवकरच ही स्पर्धा आणखी मोठया प्रमाणात होणार
आहे,’’ असे शुक्रवारी झालेल्या पत्रकार परिषदेत जयपूर पिंक पँथर्सचा मालक अभिषेक बच्चनने सांगितले. याशिवाय पुढील हंगामात लिलावानंतर जे खेळाडू सोबत असतील, त्यांच्यासोबत यशस्वीपणे वाटचाल करू, असा विश्‍वास आव्हान संपुष्टात आल्यानंतर यू मुंबाचा कर्णधार अनुप कुमारने व्यक्त केला होता.
चालू वर्षी दोन हंगाम खेळवल्यानंतर स्पध्रेच्या संयोजकांनी वर्षांत एकच हंगाम खेळवण्याचा निर्णय घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. परंतु सध्या होत असलेल्या 40 दिवसांच्या हंगामाऐवजी तो कालावधीत वाढवण्याचा ते गांभीर्याने विचार करीत आहेत. त्यानुसार पुढील हंगामात आणखी चार संघ सहभागी होणार असून, यात चेन्नई, अहमदाबाद, केरळ आणि गुवाहाटी या संघांचा सहभाग होण्याची चिन्हे आहेत.