Breaking News

पर्यावरणस्नेही विकासनीती राबवल्यास शाश्‍वत विकास : कुलकर्णी

सातारा, दि. 7 (प्रतिनिधी) : सध्या जगात भारतासह सर्व देशामध्ये जीडीपी वाढवण्याची स्पर्धा लागली आहे परंतु निसर्ग संसाधानाचा बळी देऊन वाढत असलेला जी.डी.पी. म्हणजे शाश्‍वत विकास नाही. जर दोन्ही बाजूचा जमा खर्च मांडला तर विकास दर हा उणे अंकात जाईल. सध्या कोणत्याच देशाचा विकास हा शाश्‍वत नाही. पर्यावरणस्नेही विकासनिती राबवली तरच शाश्‍वत विकास शक्य आहे, असे मत पर्यावरणवादी विचारवंत दिलीप कुलकर्णी यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्र साहित्य परिषद, शाहुपुरी शाखेच्यावतीने जागितक पर्यावरण दिनानिमित्त आयोजित निसर्गपूरक जीवनशैली कशी असावी या विषयावर दिलीप कुलकर्णी बोलत होते. व्यासपीठावर महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्यवाह विनोद कुलकर्णी, किशोर बेडकिहाळ आणि नगराध्यक्ष विजय बडेकर होते.
कुलकर्णी म्हणाले, अतिरेकी उर्जेच्या वापरामुळे एकीकडे पर्यावरणाचा आणि दुसरीकडे त्यातून निर्माण होणार्‍या सुविधांमुळे मानवी क्षमतांचा र्‍हास होऊ लागला आहे. सुख आणि आनंद या दोन भावनांची सांगड उपभोगाशी घातली गेल्याने जीवन अतिशय गतिमान बनले आहे. मात्र अधिकाधिक मिळवण्याच्या हव्यासामुळे माणसे स्वास्थ्य हरवून बसली आहेत. खरे तर आनंद कुठे बाहेर नसून आपल्या मनात असतो मात्र याचा सध्या पूर्णपणे विसर पडला आहे. त्यामुळेच आधुनिक विज्ञानाला जरी जंतुजन्य आजारांवर नियंत्रण मिळविण्यात यश आले असले तरी मनोकायिक आजारांचे प्रमाण मात्र वाढले आहे. भूतान ते क्यूबा सम्यसक विकासाच्या दिशेत या पुस्तकात भूतान आणि क्यूबाने केलेल्या कार्याचे वर्णन केले आहे. त्या पुस्तकातील महत्वाचे उल्लेख सांगत भूताना आणि क्यूबाने प्रतिकूल परिस्थितीवर मात करत विकास कसा साधला हे प्रसंग, उदाहरणासह सांगितले. या दोन देशांपासून भारताला बोध घेता येईल, तत्वज्ञान घेता येईल असे यांचे कार्य आहे परंतु भारत सध्या दोन अंक विकास दर गाठण्याच्या ध्येयाने पछाडला आहे परंतु हा होणारा विकास शाश्‍वत नाही हे वेळीच ओळखणे गरजेचे आहे. पर्यावरण दिन म्हणजे नुसते झाडे लावणे, प्लॅस्टिक कचरा उचलणे नाही तर पर्यावरणपूरक जीवनशैली अंगीकारणे, ऊर्जेचा कमीत कमी वापर करणे आणि नैसर्गिक संसाधानात वाढ कशी होईल यासाठी प्रयत्न करणे होय असेही त्यांनी सांगितले.
यावेळी ज्येष्ठ विचारवंत किशोर बेडकिहाळ यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा साहित्य परिषद शाखेच्यावतीने सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर जनता सहकारी बँकेचे निवडून आलेले संचालक विनोद कुलकर्णी, अमोल मोहिते, माधव सारडा, चंद्रशेखर घोडके, जयेंद्र चव्हाण, अविनाश बाचल, रवींद्र माने, बाळासाहेब लोहार, बाळासाहेब गोसावी, वजीर नदाफ, रामचंद्र साठे, डॉ. चेतना माजगावकर यांचा विशेष सत्कार करण्यात आला. दिलीप कुलकर्णी यांची ओळख डॉ. उमेश करंबळेकर यांनी करुन दिले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विनोद कुलकर्णी यांनी केले. सूत्रसंचालन आणि आभार नंदकुमार सावंत यांनी मानले. कार्यक्रमास महाराष्ट्र साहित्य परिषद शाहुपुरी शाखेचे पदाधिकारी, सदस्य आणि पर्यावरणप्रेमी मोठया संख्येने उपस्थित होते.