Breaking News

‘रिझर्व्ह बँके’कडून व्याजदर ‘जैसे थे’!

नवी दिल्ली, दि. 08 - रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी नव्या आर्थिक वर्षातील दुसरे द्वैमासिक धोरण जाहीर करताना व्याजदरांत कोणताही बदल केलेला  नाही. रिव्हर्स रेपो रेट 6 टक्क्यांवर आणि रेपो रेट 6.5 टक्क्यांवर कायम ठेवण्यात आला आहे. तसेच उठठ किंवा कॅश रिझर्व्ह रेशोही चार टक्क्यांवर कायम ठेवण्यात  आला आहे.

यापुढील काळात मॉन्सूनची प्रगती आणि विविध आर्थिक घडामोडी विचारात घेऊन पुढील पतधोरण आढाव्यात व्याजदरकपातीबाबत विचार केला जाईल, असे  त्यांनी स्पष्ट केले. मात्र, त्याबाबत कोणतेही स्पष्ट संकेत त्यांनी दिले नाहीत. यापूर्वी एप्रिलमध्ये 0.25 टक्क्यांची कपात केली होती. त्यामुळे सध्याची महागाईची  आर्थिक स्थितीचा विचार करून व्याजदरांबाबत निर्णय घेतल्याने सध्याच्या स्थितीचा विचार करता दर जैसे थे‘ ठेवणे योग्य आहे, असे स्पष्टीकरण राजन यांनी  दिले. आर्थिक सुधारणांबाबत अजून कार्यवाही सुरू आहे. विकासाबाबत लक्ष्यही हळूहळू वाढत आहे. चालू वर्षात एप्रिल महिन्यापासून रिझर्व्ह बँकेने व्याजदर पाव  टक्का कमी केले होते, असेही राजन यांनी सांगितले. सध्या जागतिक स्तरावर खनिज तेलाचे भाव वाढत असून आत्ताच तेलाचा भाव प्रति बॅरल 50 डॉलरच्या पुढे  गेला आहे. यामुळे भविष्यात महागाई वाढण्याचे संकेत आहेत. त्यामुळेच सावधगिरीची उपाययोजना म्हणून व्याजदरात कपात न करता, रघुराम राजन यांनी ते  कायम ठेवल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.