शेतकर्यांची स्थिती चिंताजनक ः शिवाजीराजे भोसले
मराठा आरक्षण मिळेपर्यंत स्वस्थ बसणार नाही ः संजय सावंत
नांदेड, दि. 08 - महाराष्ट्रातील शेतकर्यांची, प्रामुख्याने मराठा समाजाची स्थिती अत्यंत बिकट असून येथील शेतकर्यांच्या आत्महत्येचे आकडे चिंताजनक आहेत. मराठा समाजाला महाराष्ट्राबाहेर आरक्षण आहे, ते आरक्षण महाराष्ट्रातील मराठ्यांना देखील द्यावे तसेच शासनाने येथील शेतकर्यांना खते, बी-बियणांवरील सबसिडीसह त्यांच्या मुलांचे शिक्षण, आरोग्याच्या योजना पुरवाव्यात असे आवाहन छ. शिवाजी महाराजांचे सोळावे वंशज शिवाजीराजे भोसले यांनी केले आहे तर शिवक्रांती युवा सेनेचे संस्थापक अध्यक्ष संजय सावंत म्हणाले की, मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत स्वस्थ बसणार नसून, यासाठी सरकारला जाब विचारून संघटनेच्या वतीने अविरत संघर्ष उभा करणार आहोत.
मराठा आरक्षणासह शिक्षण, युवा सक्षमीकरण या विषयावर संबंध महाराष्ट्रभर चळवळ चालविणार्या शिवक्रांती यावा संघटनेचे अधिवेशन शहरातील लोकमान्य मंगल कार्यालयात संपन्न झाले. यावेळी उद्घाटक म्हणून ते बोलत होते. अधिवेशनाला अध्यक्ष म्हणून धडक कामगार युनियनचे अध्यक्ष अभिजित राणे हे होते तर व्यासपीठावर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संजय सावंत, कामगार नेते प्रदिप कदम, मनिष वडजे, अनिल गरड, दत्ताभाऊ गव्हाणे, परमेश्वर नलावडे, प्रकाश पाटील, बालाजी काळे, संतोष संत्रे, भरत कदम, अशोक सोनवणे, ऍड.संजय फुन्ने, मनोज आचार्य, संजय ताटे, दिपक सोनवणे, इंद्रजीत पौळ, केशव साबळे आदींची उपस्थिती होती.
