Breaking News

वारकर्‍यांना सवलतीच्या दरात सिलेंडर

पुणे, दि. 07 - आषाढी वारी सोहळ्यात सहभागी होणार्‍या दिंड्यांना सवलतीच्या दरात गॅस सिलेंडर उपलब्ध करून देण्याचा निर्णय विभागीय आयुक्त कार्यालयात झालेल्या बैठकीत घेण्यात आला. विभागीय आयुक्त कार्यालयात पुरवठा विभागाचे उपायुक्त प्रकाश कदम यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत या बाबत निर्णय घेण्यात आला.
प्रत्येक दिंडीला पालखी सोहळा कालावधीत आठ ते दहा सिलेंडरचा पुरवठा करण्याचे तीनही गॅस कंपन्यांनी मान्य केले. प्रत्येक कंपनी पालखी सोहळ्याच्या का
लावधीत पालखी मार्गावर सिलेंडर पुरवण्यासाठी खास वाहन तैनात करणार असून सिलेंडरची मागणी आणि पुरवठ्याचा समन्वय करण्याची जबाबदारी महसूल खात्याकडे सोपविण्यात आली. एकावेळी एका दिंडीला सहा सिलेंडर दिले जाणार आहेत. यापूर्वी चार सिलेंडर देण्यात येत होते. यासाठी प्रत्येक दिडींनी आपले बँक खाते उघडावे आणि त्याच नावाने गॅस कनेक्शन घ्यावे. सदरच्या बँक खात्यावर गॅस कंपनी अनुदानाची रक्कम जमा करेल, सवलतीच्या दरासाठी आधार क्रमांकाची आवश्यकता नाही, असे यावेळी सांगण्यात आले.
पालकमंत्री गिरीश बापट यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी झालेल्या बैठकीत याबाबत चर्चा झाली होती. त्यानुसार विभागीय आयुक्त एस. चोक्कलिंगम आणि जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी अशा आशयाची बैठक घेण्याचे सूचना दिल्या होत्या. त्यानुसार आज ही बैठक घेऊन निर्णय घेण्यात आला. पालखी सोहळा कालावधीत सिलेंडरचा पुरवठा पुरेसा राहील याची खात्री तीनही कंपन्यांनी करावी, अशा सूचना उपायुक्त प्रकाश कदम यांनी दिल्या. सिलेंडरच्या वितरणावेळी प्रवासात काय काळजी घ्यावी याबाबतची माहिती देणारी पत्रके वितरीत केली जावीत, अशा सूचनाही देण्यात आल्या.