Breaking News

भाजपमध्ये धुसफूस सुरूच

मुंबई, दि. 07 -  भाजपमध्ये एकनाथ खडसे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर सुरू झालेली धुसफूस अजूनही कायम असून मंत्रालय नजिकच्या भाजप प्रदेश मुख्यालयावर खडसे समर्थकांनी धडक देत जोरदार घोषणाबाजी केली तसेच या वेळी आंदोलकांचा प्रमुख रोष मुख्यमंत्र्यांवरच होता. मुख्यमंत्र्यांच्या विरोधात या वेळी घोषणाबाजीही करण्यात आली. दरम्यान, एकनाथ खडसे यांनी आपल्या समर्थकांना आंदोलन थांबविण्याचे तसेच राजीनामे न देण्याचे आवाहन केले आहे.
शनिवारी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा गंभीर आरोपांच्या घे-यात सापडलेल्या महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी अखेर पक्षाच्या आदेशानंतर दिला. यामुळे नाराज झालेल्या त्यांच्या जळगाव जिल्ह्यातील समर्थकांनी मुंबईत गर्दी केली आहे. खडसे समर्थकांनी रामटेक या त्यांच्या शासकीय निवासस्थानी ठिय्या मारला होता. जळगाव महापालिकेच्या 14 नगरसेवकांनी भाजप जिल्हाध्यक्षांकडे राजीनामेही दिले आहेत. पक्ष नेतृत्वावर खांदेशचे नेतृत्व संपविण्याचा आरोप करताना जोपर्यंत नाथाभाऊंवरील आरोप सिद्ध होत नाहीत, तोपर्यंत त्यांना मंत्रिपदावर ठेवायला हवे होते, अशी भावना व्यक्त केली तसेच हा सर्व प्रकार म्हणजे नाथाभाऊंविरोधात पक्षातीलच काही नेत्यांचे षङयंत्र असल्याचा आरोप करत मुख्यमंत्र्यांवर तोंडसुख घेतले, त्यांच्या विरूद्ध घोषणाही दिल्या. यामुळे पक्ष कार्यालयात अस्वस्थता पसरली होती.