Breaking News

हिलरी यांची राष्ट्राध्यक्षपदासाठी उमेदवारी निश्‍चित

वॉशिंग्टन, दि. 07 -  हिलरी क्लिटंन यांनी डेमोक्रॅटिक पक्षाकडून अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची उमेदवारी मिळवण्यासाठी आवश्यक असलेल्या संख्याबळाचा आकडा गाठला असल्याची माहिती असोसिएटेड प्रेसने दिली आहे. त्यांच्या उमेदवारीची अधिकृत घोषणा डेमोक्रॅटिक पक्षाकडून झाल्यानंतर अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणुक लढवणा-या त्या पहिल्या महिला ठरणार आहेत.
प्युरटो रिको प्रायमरीमध्ये आठवडयाच्या अखेरीस विजय मिळवल्यानंतर उमेदवारी मिळवण्यासाठी त्यांना 2,383 प्रतिनिधींचे समर्थन आवश्यक होते. हा पाठिंबा हिलरी क्लिटंन यांनी मिळवला आहे. जुलै महिन्यात फिलाडेलफीया येथे डेमोक्रॅटिक पक्षाचे अधिवेशन होणार आहे. तिथे रिपब्लिकन उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात हिलरीच्या उमेदवारीची अधिकृत घोषणा केली जाईल. आठ नोव्हेंबरला अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे. हिलरी यांची निवड निश्‍चित असताना यासंबंधी बोलताना त्या म्हणाल्या की, मी त्या ऐतिहासिक क्षणाच्या अत्यंत निकट आहे. मंगळवारी सहा राज्यांमध्ये मतदान होणार आहे तिथे अजून भरपूर काम करायचे आहे.