Breaking News

कारखान्यासारखी चूक जिल्हा परिषद निवडणूकीत नको ः अविनाश मोहिते

कराड, दि. 29 (प्रतिनिधी) ः गेल्या पाच वर्षात इतर कारखान्यांच्या बरोबरीने कृष्णेने ऊसदर दिला. पण मागील दाराने सत्तेवर आलेल्या मंडळींनी यंदा राजारामबापू कारखान्यापेक्षा टनाला 450 रुपये दर कमी का दिला, असा सवाल करत वार्षिक सभेला मंडप घालायला पैसे नाहीत असे म्हणणारे मुलाच्या नियोजन कक्षासाठी 25 ते 30 लाख रुपये खर्च कोठून करतात. कारखान्याच्या निवडणूकीत केलेली चूक लोकांच्या चांगलीच लक्षात आली आहे. येत्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणूकीत ती चूक पुन्हा करु नका, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस अविनाश मोहिते यांनी केले. 
कराड तालुक्यातील शेणोली ग्रामपंचायतीच्यावतीने 3 टक्के अपंग कल्याण निधीतून लाभार्थींना भांडी वाटप प्रसंगी ते बोलत होते. जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण सभापती डॉ. सौ. सुरेखा शेवाळे अध्यक्षस्थानी होत्या. सरपंच आदित्या कणसे, उपसरपंच अमोल पाटील, ह. भ. प शिवाजी कणसे, विकास सेवा सोसायटीचे अध्यक्ष सयाजीराव महिंद, माजी अध्यक्ष सुनिल शामराव कणसे, दिपकशेठ कणसे, एस. बी. कदम, किरण कदम, विजय पाटील, सर्जेराव पाटील, लालासाहेब पाटील, पोपटराव जगताप, प्रकाश साळुंखे, उदयसिंह कणसे यांची प्रमुख उपस्थिती होती.
अविनाश मोहिते म्हणाले, शेणोली ग्रामपंचायतीचे चांगले काम सुरु आहे. गावातील एकीचे बळ कायम ठेवा. विधायक कामाच्या माध्यमातून चालत राहिल्यास निश्‍चितच समाजात प्रतिष्ठा उंचावते.
मला सार्वजनिक कामे सूचवा. आ. शशिकांत शिंदे व आ. बाळासाहेब पाटील यांच्या माध्यमातून ती कामे पूर्ण करण्यासाठी मी कटिबध्द आहे. शरद पवार यांचे विचार कराड दक्षिणेत घरोघरी पोहचवणार आहे. त्यामुळे सभासदांनी कारखाना निवडणूकीत जी चूक केली. ती सुधारण्याची वेळ जिल्हा परिषद निवडणूकीत आली आहे. कारखान्यावर कर्ज आहे. तर मग मुलाला 25 ते 30 लाख रुपये खर्च करुन नियोजन कक्ष कशासाठी उभा केला. मागील वर्षीपेक्षा यावर्षी रिकव्हरी कमी का झाली. माझ्या कारकिर्दित इतर कारखान्यांच्या बरोबरीने ऊसदर होता. पण यावर्षी राजारामबापूपेक्षा 450 रुपयाने दर कमी का मिळाला. ऊसदर द्यायला मन मोठं लागतं, असाही उपरोधात्मक टोला मोहिते यांनी लगावला.