Breaking News

प्रो-कबड्डीत महिला कबड्डी चॅलेंजला सुरुवात

मुंबई, दि. 29 -  प्रत्येक मोसमागणिक लोकप्रियता वाढत असलेल्या प्रो-कबड्डीत मंगळवारी नवा इतिहास रचला गेला. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून आज स्पर्धा करणार्‍या महिलांनी आम्हीही ताकदीच्या आणि चपळतेच्या खेळात कमी नाही, हे कबड्डी विश्‍वाला दाखवून दिले. आज सादर झालेला महिला प्रो-कबड्डीचा पहिला सामाना प्रेक्षकांमध्ये नवा उत्साह निर्माण करणारा ठरला.
प्रो-कबड्डीत महिला कबड्डी चॅलेंज या नावाखाली प्रायोगिक तत्त्वावर प्रो-कबड्डी सुरू झाली. ममता
पुजारीच्या फायर बर्ड आणि अभिलाषा म्हात्रेच्या आईस दिवास यांच्यातील सामन्यात फायरने 25-12 असा विजय मिळवला. कोण जिंकले, कोण हरले यापेक्षा महिला कबड्डी जिंकली, अशीच भावना वरळीतील सरदार वल्लभभाई स्टेडियममध्ये दिसून येत होती. पुरुषांच्या प्रो-कबड्डी सामन्याला मिळणारा आवाजी प्रतिसाद आणि कल्ला तसाच होता. यशस्वी चढाई किंवा पकडीला मिळणारा पाठिंबाही तसाच होता.
या नव्या पर्वाची सुजवात झाल्यावर प्रथम दोन्ही संघांकडून सावध खेळ झाला आणि पहिला गुण मिळवण्याचा बहुमान आईस डेव्हिस संघाच्या मराठमोळ्या सोनाली शिंगटेने मिळवला. तिने डु ऑर डाय चढाईत दोन गुण मिळवले; पण तिच्या संघाला अपेक्षित वाटचाल करता आली नाही. फायर बर्ड्स संघाची आणि भारतीय संघाची विद्यमान कर्णधार सहा फूट उंचीच्या ममता पुजारीने दरारा सिद्ध केला. उंचीचा फायदा घेत तिने चढाईत हमखास गुण मिळवले. ममता आणि पायल चौधरी यांनी प्रत्येकी पाच गुण मिळवले. त्यांना कविता ठाकूर आणि पुण्याच्या किशोरी शिंदे यांनी प्रत्येकी तीन गुणांची साथ दिली. आईस संघाकडून सोनाली आणि खुशबू नरवाल यांनी प्रत्येकी चार गुण मिळवले. अभिलाषाला तीन गुणांची कमाई करता आली.