Breaking News

राजर्षी छत्रपती शाहु महाराजांनी सामाजिक न्यायाची शिकवण दिली -जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल

परभणी, दि. 30 - राजर्षी छत्रपती शाहु महाराजांनी त्यांच्या कार्यकाळात त्यांना होणारा विरोध झुगारुन सामाजिक न्यायाची शिकवण दिली. सामाजिक न्यायाची ही  भावना आपण आपापसात निर्माण केली पाहिजे असे जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल यांनी सांगितले. राजर्षी छत्रपती शाहु महाराज यांची 142 वी जयंती व सामाजिक न्याय दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथील सभागृहात कार्यक्रम झाला. अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल होते. कार्यक्रमास महापौर संगीता वडकर, समाज कल्याण सभापती, श्रीमती गिरीजाबाई पुंजारे, प्रमुख व्याख्याते संजय बालाघाटे, माधवराव पाटील महाविद्यालय,पालम, सहायक आयुक्त समाज कल्याण तेजस माळवदकर, जिल्हा समाज कल्याण अधिकारी एल.जी.कदम, समाज कल्याण अधिकारी आर.एच.एडके व अन्य मान्यवर उपस्थित होते. आश्रमशाळा दर्गा रोड, येथील विद्यार्थींनी स्वागतगीत सादर केले. समाज कल्याण विभागाअंतर्गत कार्यरत असलेल्या शासकीय निवासी शाळा तसेच मुलांचे व मुलींचे शासकीय वसतीगृह आणि विजाभज प्राथमिक/माध्यमिक/उच्च माध्यमिक आश्रम शाळा तसेच अंपग विद्यार्थ्यांच्या शाळा, आणि अनुदानित वसतीगृहांमधून इयत्ता दहावी / बारावीच्या परीक्षेत विशेष उल्लेखनीय यश मिळवून सर्वप्रथम व द्वीतीय आलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र, सन्मानचिन्ह व मंत्री, सामाजिक न्याय यांचा संदेश आणि पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला. जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल म्हणाले, देशातील 80 टक्के लोक हे प्रतिकूल स्थितीत जीवन जगत आहेत. संघर्ष करित आहेत. आपण सर्वांनी सर्वप्रथम माणूस आहोत हे लक्षात ठेवून माणुसकी जपली पाहिजे. राजर्षी शाहु महाराजांनी त्यांच्या काळात बहुजन समाजाच्या विकासासाठी त्यांच्या शिक्षणाबाबत भरीव कार्य केले. आरक्षणाचे जनकही राजर्षी शाहु महाराज आहेत. राजर्षी शाहु महाराजांबाबत विपुल प्रमाणात साहित्य उपलब्ध असून त्याचा सर्वांनी अभ्यास केला पाहिजे. अन्यायाविरुध्द संघर्ष करताना देखील आपले व्यक्तीमत्व विनयशिल असावे. आपण जे बोलतो त्याप्रमाणे आपली कृती देखील असली पाहिजे. उत्तम चारित्ˆय हीच खरी संपत्ती आहे. समाज परिवर्तन होऊन चारित्र्यसंपन्न समाज निर्माण होण्याची गरज असल्याचे श्री.महिवाल यांनी सांगितले. कार्यक्रमांस समाजकल्याण विभागाचे कर्मचारी, शाळा, महाविद्यालयाती विद्यार्थी, महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.