केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परिक्षेतील गुणवंतांचा सत्कार
। मराठी मुलांनी स्पर्धा परिक्षेत यश मिळवावे : श्रीकांत सुसे । शहरातील मुलेच स्पर्धा परिक्षेत यशस्वी होतात हा गैरसमज
पाथर्डी (प्रतिनिधी) । 29 - केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी इंग्रजी भाषाच अवगत असावी, असा गैरसमज दूर व्हावा. कोणत्याही क्लासमधे शिकवणी न घेता मराठीतून लेखी व तोंडी परीक्षा देवून शेतकर्याचा मुलगा जिल्हाधिकारी होवू शकतो. याचे उदाहरण मी असल्याने मराठी मुलांनी स्पर्धा परीक्षेत यश मिळवावे, असे आवाहन केंद्रीय लोकसेवा परीक्षेत यश संपादन केलेल्या श्रीकांत सुसे यांनी केले.भगवान इन्स्टिट्युट ऑफ रुलर डेव्हप्मेंट (बर्ड) संस्थेच्या वतीने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळविलेल्या श्रीकांत सुसे,दत्तात्रय शिंदे,ऋषीकेश खिलारी तसेच पाथर्डीचे सुपुत्र भारतीय सेनेमधे कुमाऊ रेजीमेंटचे लेफ्टनंट शुभम भागवत व मिग 27 लढाऊ विमानाचे फ्लाईट लेफ्टनंट (फायटर पायलट) विष्णू शिरसाट यांचा गौरव केला. बर्डच्या अध्यक्षा ज्योती ढाकणो, डॉ.दीपक देशमुख, डॉ.मृत्युंजय गज्रे, डॉ.शिरीष जोशी, डॉ.सचिन गांधी, विठोबा शिरसाट, सतीष भागवत उपस्थीत होते. यावेळी बोलताना सुसे म्हणाले, श्रीमतांचीच, शिकवणी लावलेली, इंग्रजी भाषा अवगत असलेले व शहरातील मुलेच स्पर्धा परीक्षेत यशस्वी होतात. असा गैरसमज दूर करा. जिद्दीला नियोजन पूर्वक मार्गदर्शनाखाली कष्टीची जोड मिळाली की यश हात जोडुन समोर उभे राहते. दत्तात्रय शिंदे म्हणाले, तेलंगणा राज्याच्या गुप्तवार्ता विभागाचे पोलिस उपमहासंचालक महेश भागवत हे आमचे आयडाँल आहेत. त्यांनी केलेल्या मार्गदर्शनाची आम्ही पोहच पावती आहोत. ऋषीकेश खिलारी म्हणाले माती पंख आणि आकाश या पुस्तकातून प्रेरणा घेवून आम्ही केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळविले. शुभम भागवत म्हणाले लक्ष्य चित्रपटात ऋतीक रोषणची आई त्याच्या खांद्यावर स्टार लावतानाचे दृष्य पाहीले. आणि प्रेरणा मिळाली आपणही असेच होवुन दाखवायचे आणि लेफ्टनंट झालो. फ्लाईट लेफ्टनंट विष्णू शिरसाट म्हणाले, स्वत:वर विश्वास असणारी माणसच वेगळं काहीतरी करु शकतात. तुम्ही झेप घ्या दिशा तुमच्याकडे येतीलच. डॉ.मृत्युंजय गज्रे यांनी प्रस्ताविक केले. समिक्षा जोशी हिने सूत्रसंचालन केले.