Breaking News

संग्रामपूर तालुक्यातील विहीरींना लागले झरे

बुलडाणा, दि. 30 - पाचवीलाच पुजलेला दुष्काळ.. ही म्हण जिल्ह्यातील अवर्षणप्रवण भागासाठी तंतोतंत लागू पडते. कमी-अधिक तीव्रतेने पडणारा पाऊस, कमी कालावधी जास्त पडणारा पाऊस अशा लहरी पावसामुळेही शेतीचे चक्र विस्कटले आहे. अनार्वषणामुळे हवालदील झालेला शेतकरी.. पाणी नसल्यामुळे डोक्याला हात लावून पावसाची वाट बघणारा शेतकरी असे चित्र आपण जिल्ह्यामध्ये पहावयास मिळते.  मात्र हे चित्र बदलविण्यासाठी राज्य शासनाने शेत शिवार जलयुक्त करण्याचे ठरविले. 
राज्यात लोकचळवळीच्या रूपामध्ये जलयुक्त शिवार अभियानाचा प्रारंभ केला. पुढील पाच वर्षात राज्यातील 5 हजार गावे दुष्काळमुक्त करण्याचा संकल्पच शासनाने जाहीर केला. जिल्ह्यातही पहिल्या टप्प्यात 330 व दुसर्‍या टप्प्यात 245 गावांची निवड करण्यात आली. पहिल्या टप्प्यात 80 टँकरग्रस्त गावे अभियानात प्रामुख्याने निवडली होती.   या अभियानातंर्गत जिल्ह्यात जलंसधारण व मृदसंधारणाची मोठ्या प्रमाणावर कामे करण्यात आली. या कामांची फलश्रूती आता दिसू लागली असून संग्रामपूर तालुक्यातील लाडणापूर गाव शिवारातील विहीरींना पाण्याचे झरे लागले आहेत.
खारपाणपट्टयात असलेल्या संग्रामपूर तालुक्यात या अभियानाच्या माध्यमातनू भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेने खूप मोठ्या प्रमाणावर काम केले. या भागामध्ये जलपुर्नभरण चर व गॅबीयन बंधार्‍यांची कामे घेण्यात आली. या कामांमुळे खारपाणपट्टयातील लाडणापूर भागात जमिनीमध्ये पाण्याची पातळी वाढण्यास चांगलीच मदत झाली. भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेने केलेल्या कामांमुळे या भागातील भूजल पातळी कमालीची वाढणार आहे. लाडणापूर येथील गॅबीयन बंधारा व जलपुर्नभरण चर कामांवर 28 लक्ष 16 हजार 654 रूपयांचा निधी खर्च झाला आहे. गॅबीयन बंधारे व जलपुर्नभरण चर प्रामुख्याने नाले, ओढ्यांच्या शेजारी खोदण्यात आले आहे. त्यामुळे यामध्ये जमा झालेले पाणी थेट जमिनीत मुरत आहे. परिणामी, विहीरींना खालपर्यंत झरे लागल्याचे चित्र या परिसरात दिसत आहे.
जलयुक्त शिवार या महत्वाकांक्षी अभियानामुळे निश्‍चितच भूजल पातळीत वाढ होत असून शेतीकरिता शाश्‍वत सिंचनाची सोय उपलब्ध होत आहे. जलयुक्तमधील सर्व प्रयतकंचा परिपाक आज पहिल्याच पावसात विहीरीला लागलेल्या झरांच्या माध्यमातून दिसतो आहे. जिल्ह्यातील सिंचनाच्या कामामुळे या पावसाळ्यात मोठा खंड पडला तरी विहीरीच्या पाण्यावर एखादे ओलीत शेतकर्‍यांना करता येणार आहे. जलयुक्त शिवारमुळे विहीरीला आले पाणी.. त्यामुळे शेत पिकेल सोन्यावाणी.. एवढे मात्र निश्‍चित .