Breaking News

अधिक्षक अभियंता सुर्यवंशीच्या मनमानीला चाप लावा

सार्वजनिक बांधकाम :  देयकांच्या चौकशीसाठी शिवक्रांतीचे धरणे आंदोलन

औरंगाबाद, विशेष/प्रतिनिधी, दि. 30 - औरंगाबाद साबांमंडळाचे अधिक्षक अभियंता ए.बी.सुर्यवंशी यांनी मंजूर आणि अदा केलेल्या देयक कामांची सखोल  चौकशी व्हावी तसेच कार्यकारी अभियंता वृषाली गाडेकर यांच्या कामात असलेला अधिक्षक अभियंत्यांचा हस्तक्षेपही थांबवून त्यांचीही चौकशी व्हावी या  मागणीसाठी शिवक्रांती युवा सेनेने धरणे आंदोलनाचा इशारा दिला आहे. दरम्यान, साबांतील बदली प्रकरणही चव्हाट्यावर आले असून बदली प्रक्रियेत मुख्यमंत्र्यांची  घोर फसवणूक झाल्याची चर्चा आहे.
औरंगाबाद साबां मंडळात अधिक्षक अभियंता ए.बी.सुर्यवंशी
यांचा मनमानी कारभार, कोट्यवधी रूपयांची नुकसान होण्यास कारणीभूत ठरल्याने चर्चेचा विषय  ठरला आहे. अधिक्षक अभियंता पदाचा अधिकार गाजवित असतांना साबांची मालकी मिळविल्याप्रमाणे त्यांचे वर्तन सुरू आहे. वास्तविक महाराष्ट्र शासनाने  अधिक्षक अभियंता सुर्यवंशी यांना साबांची शेती राखण्यासाठी करारबध्द केले तथापि शेतीचा मालक असलेल्या शेतकर्‍याने आपली जनावरे कुरणात सोडावी  अशाच पध्दतीने अधिक्षक अभियंता ए.बी.सुर्यवंशी साबां मंडळात भ्रष्टाचाराची शेती कसत आहेत. लाच स्वीकारून देयके मंजूर करण्याचा निकष त्यांनी लावला  असून जे कंत्राटदार लाच देतील त्यांचीच देयके मंजूर करूर करून अदा करायची, अशा कंत्राटदारांच्या कामाची तपासणी करण्याची गरज त्यांना भासत नाही.  विशेष म्हणजे विधानसभापती हरिभाऊ बागडे यांच्या कार्यक्षेत्रातच असे उद्योग सुरू असल्याने ए.बी.सुर्यवंशी यांच्या धाडसाचे उपहासात्मक कौतूक केले जात  आहे. इतकेच नाही तर स्वतः अधिक्षक अभियंता असतांना कार्यकारी अभियंता वृषाली गाडेकर यांच्या कामात हस्तक्षेप करून त्यांना मदत करण्यात त्यांचे  स्वारस्य वाढले आहे. एकुणच ए.बी.सुर्यवंशी यांच्या कार्यपध्दतीविषयी शंका व्यक्त केली जात असून त्यांनी अदा केलेली देयकेही संशयाच्या गर्तेत आहेत. या  पार्श्‍वभूमावर शिवक्रांती युवा सेनेचे संजय सावंत यांनी संघर्षाचे रणशिंग फुंकले असून ए.बी. सुर्यवंशी यांची एसीबीमार्फत आणि खातेनिहाय विभागीय चौकशी  व्हावी यासाठी औरंगाबाद महसुल आयुक्तांच्या कार्यालयासमोर 1 जुलैपासून धरणे आंदोलन करणार आहेत. दरम्यान साबांत राबविली गेलेली 150 अभियंत्यांची  बदली प्रक्रियाही संशयाच्या भोवर्‍यात सापडली असून या प्रक्रियेत दस्तुरखुद्द मुख्यमंत्र्यांचीच फसवणूक झाल्याचे बोलले जात आहे.
मुख्यमंत्र्यांची फसवणूक कुणी केली?
शाखा अभियंता, उपअभियंता, कार्यकारी अभियंता अधिक्षक अभियंता अशा 150  क्षेत्रिय अभियंत्यांच्या बदल्या झाल्या. या बदल्यांमध्ये कागदाआड  कागद घालून मुख्यमंत्र्यांच्या डोळ्यात धुळ फेकली गेल्याची चर्चा आहे. कुणी केली ही चलाखी, साबांचा तो उच्चपदस्थ कोण? कशी झाली मुख्यमंत्र्यांची  फसवणुक? वाचा उद्याच्या अंकात