Breaking News

ब्रिटनची हुकूमशाही महासंघ सहन करणार नाही

बर्लिन, दि. 29 -  ब्रिटन युरोपीय महासंघातून बाहेर पडला असला तरीही ब्रेक्सिटमधून सुखरूपपणे बाहेर येण्याइतका युरोपीय महासंघ मजबूत आहे, असे जर्मनीच्या चॅन्सेलर अँजेला मॉर्केल यांनी म्हटले आहे. तसेच यापुढील वाटाघाटींमध्ये ब्रिटनने फक्त स्वत:च्या लाभाच्या गोष्टी घेऊन हुकूमशाही चालवण्याचा प्रयत्न केल्यास ते युरोपीय महासंघ सहन करणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
ब्रिटनची माघार सहन करण्याइतपत ईयू समर्थ आहे,असे मॉर्केल यांनी सांगितले. 28 सदस्य राष्ट्रांची बैठक सुरू होण्यापूर्वी जर्मन संसदेत त्या बोलत होत्या. त्याचबरोबर भविष्यात जगात आपले हित जपण्यासही ईयू सक्षम आहे,असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले.
महासंघ स्थापन झाल्यापासून प्रथमच एखादा देश बाहेर पडण्याचा प्रसंग आलेला महासंघ युरोपात शांतता, स्थैर्य आणि भरभराट राखण्याची हमी भविष्यातही घेईल, असा विश्‍वास मॉर्केल यांनी व्यक्त केला. महासंघ सोडण्याचा निर्णय ब्रिटनने गेल्या आठवडयात सार्वमताने घेतल्याबद्दल खेद व्यक्त करून त्या म्हणाल्या की, ब्रिटन महासंघाशी वाटाघाटी करताना मात्र हुकूमशाही राबवू शकणार नाही.
ब्रिटनच्या हुकूमशाहीवर आधारित वाटाघाटी होणार नाहीत, याची आम्ही काळजी घेऊ. ज्याला कुणाला युरोपीय महासंघाचे कुटुंब सोडायचे आहे, त्याला आपण फक्त लाभ घेऊन जाऊ आणि जबाबदारी सोडून देऊ, अशी अपेक्षा करता येणार नाही, असे त्यांनी ब्रिटनला बजावले.