Breaking News

डेंग्युचे रुग्ण सापडल्यानंतर घरनिहाय सर्वेक्षण : डॉ. माने

सातारा, दि. 29 (प्रतिनिधी) : कोरेगाव शहरात डेंग्युचे रुग्ण सापडल्यानंतर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने घरनिहाय सर्वेक्षण मोहिम राबवली असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप माने यांनी दिली.
कोरेगाव नगरपंचायत असली तरी आरोग्याच्या दृष्टिने नागरिकांना वेळेत उपचार होण्यासाठी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने पावले उचलली आहेत. सर्वत्र ठिकाणी धूर फवारणी करण्यात येत आहे. ज्या ठिकाणी डेंग्युचे रुग्ण आढळले त्या घरातील पिण्याच्या पाण्याच्या रांजणामध्ये डासाच्या आळया आढळून आल्या. तसेच एका ठिकाणी बांधकाम सुरु आहे त्याठिकाणी सर्वेक्षणात आरोग्य कर्मचार्‍यांना डासांच्या आळया आढळून आल्या.
लोकांनी घरात भरून ठेवलेले पाण्यांचे राजंण खाली करुन त्यातील डासांच्या आळ्या नष्ट करण्यात आल्या आहेत. सुमारे 20 आरोग्य कर्मचार्‍यांच्या सहाय्याने घरनिहाय सर्वेक्षण मोहिम आरोग्य विभागाने राबवली आहे. याबाबत कोरेगाव नगरपंचायतीचे मुख्याधिकार्‍यांना स्वच्छतेबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच सर्वत्र धुरफवारणीही करण्यात आली आहे.