Breaking News

पिक विमा मदतीपासून वंचित शेतकर्‍यांना तात्काळ मदत करा ः आ.बोंद्रे

बुलडाणा, दि. 29 - बुलडाणा जिल्हयातील प्रमुख पिक असलेले कापूस व रायपूर ता. चिखली सर्कल मधील सोयाबीन व तुर या पिकांना पिक विम्यातून वगळले आहे. वास्तविक पाहता जिल्हयातील जवळपास 3,63,246 शेतकर्‍यांनी पिक विमा भरला असून यापैकी केवळ 2,76,908 शेतकर्‍यांनाच पिक विम्याचा लाभ मिळालेला आहे. तसेच रायपूर महसुल मंडळातील जपळपास 3500 शेतकर्‍यांनी सोयाबीन पिकाच्या विम्याचा 30 लक्ष रूपये भरणा केला आहे. यासोबतच जवळपास 700 शेतकर्‍यांनी तुर पिकाचा 12 लक्ष रूपये पिक विमा भरला आहे. परंतु शासनाने हया प्रमुख पिकांना पिक विम्यातून बाद केल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. यासाठी चिखलीचे आमदार राहुल बोंद्रे यांनी आज जिल्हाधिकारी झाडे यांना निवेदन देवून सदर शेतकर्‍यांच्या पिक विमा मदतीत सामावेश करून तात्काळ मदत करण्यात यावी, अन्यथा शेतकर्‍यासह तिव्र आंदोलन करण्यात येईल असा इशाराही यावेळी आ.बोंद्रे यांनी दिला. यावेळी जिल्हा परिषद सदस्य अशोकराव पडघान, महेंद्र बोर्डे, चॉद मुजावर, एजाज मंत्री, बबलुसेठ जयस्वाल, रामेश्‍वर गवते, अमृता तरमळे, शंकर तरमळे, राजु खेंते, राजु तरमळे, ईश्‍वर गवते, अनुफ अहिर, मोहमंद मंजुर, बबुसेठ मुजावर, शेख रशिद, भारतमामा राजपूत, मोहन वाघ यांची उपस्थिती होती.
याप्रसंगी बोलतांना आ. बोंद्रे म्हणाले की, शासनाने मोठा गाजा वाजा करीत पिक विम्याचे सरंक्षण शेतकर्‍यांना दिल्याचे सांगितले. आणी यातून कोटयावधी रूपये शेतकर्‍यांनी आशेपोटी जमा केले, मात्र पिक विम्यातुन प्रमुख पिकांना बाद करून शासनाने शेतकर्‍यांची दिशाभुल केली आहे. पिक विमा मिळेल या आशेवर अनेक शेतकरी धिर धरून होते, मात्र प्रमुख पिक विमा मदतीतून गायब झाल्याने शेतकरी प्रचंड निराश झाले आहेत. तसेच रायपूर महसुल मंडळातील सोयाबीन व तुर या पिकांनाही बाद करण्यात आल्यामुळे शेतक-यामध्ये तिव्र असंतोष निर्माण झाला आहे. त्यामुळे कापूस पिकाचे व रायपूर मंडळातील सोयाबीन व तुर या पिकांचा समावेश करून शेतक-यांना त्यांच्या हक्काच्या पिक विम्याची मदत शासानाने तात्काळ करावी अशी मागणी आ.राहूल बोंद्रे यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे केली आहे.