Breaking News

वर्धमान परिवारातर्फे माण तालुक्यात चारा डेपो सुरू

सातारा, दि. 01 (प्रतिनिधी) : दुष्काळ सदृश्य परिस्थित शेतकर्‍यांजवळील पशुधन वाचावे यासाठी वर्धमान परिवार संचलित व जैन संघ, मुंबई यांच्या सौजन्याने व जय भगवान प्रतिष्ठान, सातारा यांच्या सहकार्याने जनावरांसाठी माण तालुक्यातील वडगाव येथे मोफत चारा डेपो सुरु करण्यात आला.
दुष्काळी परिस्थितीमुळे मुक्या जनावरांच्या पिण्याच्या पाण्यासह चार्‍याचा प्रश्‍न निर्माण झाल्यामुळे माण तालुक्यातील वडगाव अंतर्गत दडसवाडा व कोकरेवाडी येथील जनावरांसाठी पाऊस पडून चार्‍याची निर्मिती होईपर्यंत मोफत चारा वाटप करण्यात येणार आहे. चारा डेपोच्या उद्घाटन प्रसंगी वर्धमान परिवार, मुंबई यांच्यावतीने देवांगभाई शहा, हेमंतजी हिरण, समरथमल जैन, अतुल शहा, रमेश ओसवाल उपस्थित होते.
यावेळी देवांगभाई शहा यांनी झाडे लावण्याचे व श्रमदानातून खड्डे घेण्याचे आवाहन केले. त्यास प्रतिसाद देत ग्रामस्थांनी 10 दिवसात काम पूर्ण करण्याचे आश्‍वासन दिले.
वडगाव ग्रामस्थांच्यावतीने यावेळी भाजप भटके विमुक्त आघाडीचे प्रदेश सरचिटणीस प्रा. धनंजय ओंबासे यांनी आभार मानले. यावेळी डॉ. प्रसाद ओंबासे, देवा ओंबासे, छगन ओंबासे, सीताराम दडस, आत्माराम कोकरे, मुनेर शेख यांच्यासह सरपंच, तलाठी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.