अहमदनगर, दि. 30 - अ.नगर जिल्हा कृषी विभाग कर्मचारी सहकारी पतसंस्थेचे काम चांगल्या पद्धतीने सुरू असून, या पतसंस्थेमुळे अनेकांना आर्थिक कर्जरूपी आधार मिळालेला आहे. कृषी कर्मचार्यांची ही पतसंस्था कामधेनू आहे. या पतसंस्थेच्या माध्यमातून चांगले काम व्हावे. सामाजिक बांधिलकीतूनही पतसंस्थेने काम करावे. 1398 सभासद असलेल्या या पतसंस्थेचा कारभार पारदर्शी व अधिक गतिमान व्हावा, अशी अपेक्षा पालकमंत्री ना. प्रा. राम शिंदे यांनी व्यक्त केली.
अ.नगर जिल्हा कृषी विभाग कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या 31व्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे दीपप्रज्ज्वलनाने उद्घाटन पालकमंत्री ना. प्रा. राम शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी विभागीय कृषी सहसंचालक विजयकुमार इंगळे, प्र. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बर्हाटे, उपविभागीय कृषी अधिकारी सुधाकर बोराळे, चेअरमन एस. बी. बाचकर, व्हा. चेअरमन के. एन. शेजूळ, लक्ष्मण भोकनळ, साहेबराव आघाव, सुरेश आठरे, जाकीर पटेल आदींसह संचालक उपस्थित होते. चेअरमन एस. बी. बाचकर म्हणाले की, पतसंस्थेचे भागभांडवल 16 कोटी 82 लाख 6 हजार 183 रुपये आहे. सभासदांना 29 कोटी 47 लाख 71 हजार 840 रुपयांचे कर्जवाप केले आहे. पतसंस्थेकडे 6 कोटी 79 लाख 9 हजार 443 इतक्या ठेवी आहेत. पतसंस्थेच्या वतीने सभासदांचा जनता अपघात विमा उतरविण्यात आला आहे. मुलींच्या विवाहासाठी पतसंस्था मदत देते. सर्व सभासदांना विश्वासात घेऊन संस्थेच्या माध्यमातून काम करीत असताना या वर्षी संस्थेला 2 कोटी 58 लाख नफा झाला आहे. पतसंस्थेस ऑडिट अ वर्ग आहे. पतसंस्थेचा कारभार आदर्श पद्धतीने सुरू असून, आज झालेल्या सभेत सर्व विषय बहुमताने मंजूर करण्यात आले, असे ते म्हणाले. व्हा. चेअरमन के. एन. शेजूळ म्हणाले की, सभासदांचा डिव्हिंडंट ऑनलाईन पद्धतीने खात्यावर जमा केला जातो. पतसंस्थेच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबविणार आहोत. पतंस्थेच्या वतीने मोठे सभागृह उभारण्याचे विचाराधीन आहे. पतसंस्थेचे सर्व निर्णय सर्वानुमते व सर्वांना विश्वासात घेऊन घेतले जातात, असे ते म्हणाले. यावेळी ना. शिंदे यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थी, सेवानिवृत्त कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आला. आभार रूपाली काळे यांनी मानले.