कौमार्य परीक्षा?
पुरोगामी महाराष्ट्र म्हणविणार्या या राज्यात 21 व्या शतकात देखील अनेक लाजीरवाणे प्रकार उघडकीस येत आहे, ज्यामुळे महाराष्ट्राची मान शरमेने खाली झुकली, जिरूे मंदिर प्रवेशासाठी महिलांना आजही संघर्ष करावा लागतो, रस्त्यावर उतरावे लागते, तर आजही एका विवाहित वधूची कौमार्य चाचणी केली जाते. हा मोठा विरोधाभास आहे. पुरूषी मानसिकतेने काठोकाठ भरलेल्या या समाजात आजही स्त्र्यिांना दुय्यम स्थत्तन चाललेली केविळवाणी धडपड बघितली की, या पुरूषी मानसिकतेची कीव येते. याच पुरूषी मानसिकेतेने ओतप्रोत भरलेल्या महाराष्ट्रातही जातपंचायतीचा बोलबाला आहे. राज्यात एकापाठोपाठ एक जातपंचायतीचे अघोरी कारनामे समोर येत असतांनाच, जातपंचायतीच्या अघोरी न्यायनिवाड्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला आहे. येथे पत्नी कौमार्य परीक्षेत नापास ठरल्याने तिच्याशी संबंध तोडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे लग्नानंतरच्या अवघ्या 48 तासांतच पतीने तिच्याशी काडीमोड घेतला आहे. या लाजीरवाणा प्रकारांची प्रसारमाध्यमाने दखल घेताच या प्रकरणातील मुलाने पिडीतेची माफी मागून तिला स्विकारण्याची तयारी केल्यामुळे या प्रकरणावर आता पडदा पडला आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार लग्नानंतरच्या पहिल्या रात्री जातपंचायतीने नववधूची कौमार्य परीक्षा घेण्याचे ठरविले. येथे लग्नानंतर प्रत्येक नववधूला ही पद्धत पार पाडावी लागते. पीडितेची परीक्षा घेण्यासाठी जातपंचायतीच्या पंचांनी पतीकडे एक पांढर्या रंगाची बेडशीट दिली व त्यावर दोघांनी शरीरसंबंध करण्याचा आदेश दिला. मात्र या कौमार्य परीक्षेत नववधू अपयशी ठरली. त्यामुळे नववधू कौमार्य परीक्षेत नापास झाल्याचा निर्वाळा देत पतीला नववधूशी वैवाहिक संबंध तोडण्याचा आदेश जातपंचायतीने दिला. जातपंचायतीने हे लग्न रद्द ठरवले. त्यानंतर पतीने जात पंचांचा आदेश मानून तिच्याशी संबंध तोडून टाकले. भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास बघितला असता, संस्कृतीच्या नावाखाली सुरू असलेला नंगानाच आपल्याला यातून दिसुन येतो. बालविवाह, सतीप्रथा, यांनी तर समस्त स्त्रियांचे जीवन उध्दवस्त करून टाकले होते. महात्मा फुले, सावित्रीमाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समस्त स्त्रियांचे जीवनमान उंचावण्यासाठी अहोरात्र संघर्ष केला, तरी ही पुरूषी मानसिकता समाजातून आजही जायला तयार नाही, जिथे स्त्रियांची कौमार्य चाचणी केली जाते, तिथे मात्र पुरूष हा मोकाट असतो, त्याची कसलीही चाचणी केली जात नाही, कसलीही बंधने लादली जात नाही, किंवा साधी विचारणा देखील केली जात नाही. हा एककल्ली न्याय असून स्त्रियांना दुय्यम लेखण्याचा प्रकार आहे. स्त्रियांनी आपले महत्व, आपले कर्तृत्व गाजवून त्या आज मोठमोठया पदावर विराजमान आहेत, असे असले तरी आजही काही भागातील स्त्रियांना आपले मूलभूत हक्क मिळत नाही, ही शोकांतिका आहे. त्यामुळे स्त्रियांच्या मागचा हा सोस कधी संपेल, या पुरूषी मानसिकतेतून त्यांची सुटका कधी होईल? हाच मोठा गहन प्रश्न आहे.
