Breaking News

लालबावटा संघटनेचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

बुलडाणा, दि. 29 - खडकपुर्णा प्रकल्पातील मच्छीमारीचा ठेका स्थानिक मच्छीमारांना देण्यात यावा, दुष्काळी परिस्थितीत ‘मासळी दुष्काळ’ जाहीर करुन मच्छीमार कुटुंबांना 50 हजार रुपये आर्थिक मदत देण्यात यावी, तसेच 30 जूनला मच्छीमार ठेक्याची मुदत संपत असून नियमबाह्य मुदतवाढ देण्यात येवू नये आदी मागण्यांसाठी लालबावटा  मच्छीमार संघटनेने आज 29 जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी राज्य सरचिटणीस कॉम्रेट राजन क्षीरसागर कॉ.पंजाबराव गायकवाड यांची उपस्थिती होती. यावेळी जिल्हाधिका-यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. 
निवेदनात नमूद आहे की, यंदाच्या वर्षी दुष्काळी परिस्थितीमुळे अनेक तलाव व धरणे मोठ्या प्रमाणावर कोरडी पडल्याने स्थानिक पारंपारीक मच्छीमार यांचा रोजगार नष्ट झाला आहे. बुलडाणा जिल्ह्यातील खडकपुर्णा प्रकल्पावर शेकडो मच्छीमार वर्षानुवषें मासेमारी करुन उपजिवीका करीत आहेत. मात्र सदर खडकपुर्णा प्रकल्पावरील तलाव ठेकेदार याने आंध्र-तेलंगण बिहार येथील मच्छीमार आणून झिंगा उत्पादन सुरु केले आहे. दंडेलशाही द्वारे स्थानिक प्रकल्पग्रस्त व पारंपारीक मच्छीमार यांना मासेमारी करण्यास मज्जाव करुन रोजी रोटी तोडण्यात येत आहे. मुळातच सदर धरणावर कायदेशीर तरतुदींचा भंग करुन भ्रष्ट व गैरकायदेशीर मार्गाने ठेकेदार व मत्स्य विभागातील वरिष्ठ अधिकारी यांनी नियमबाह्य व्यवहार चालविला आहे. सदर प्रकाराबरोबरच खडकपुर्णा प्रकल्पावरील मच्छीमारांकडून दंडेलशाहीने पिळवणूक करण्यात येत आहे. मत्स्यविकास विभागाने दिलेली खडकपुर्णा प्रकल्पावरील मासेमारी ठेक्याची मुदत 30 जून 2016 रोजी संपुष्टात येत आहे. सदर ठेकेदार सिक्युरिटीच्या नावाखाली स्थानिक गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींना हाताशी धरुन गुंडगिरी चालविली आहे. ठेकेदाराने नेमलेल्या सिक्युरिटी करणा-या व्यक्तीकडे सिक्युरिटी व्यवसाय करण्याचा कोणताही कायदेशीर परवाना नाही. मात्र पोलिस प्रशासनातील भ्रष्ट अधिकारी कोणतीही शहानिशा न करता निदोंष प्रकल्पग्रस्त व पारंपारीक मच्छीमार तरुणांवर खोट्या चोरीच्या केसेस करीत आहेत. यामुळे स्थानिक प्रकल्पग्र्रस्त व पारंपारीक मच्छीमार उध्वस्त होत आहेत. प्रकल्पग्रस्त व पारंपारीक मच्छीमार यांच्यात शासनाविरुध्द तीव्र असंतोष निर्माण झाला आहे.
ठेकेदार व मत्स्य विकास विभागाच्या या बेकायदेशीर व कारभाराविरुध्द आज जिल्हाधिकारी कार्यालय आणि मत्स्य विकास विभाग कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी विविध तालुक्यातील मच्छीमारांची उपस्थिती होती.