Breaking News

समाजासाठी आर्दशवत असा उपक्रम : शिरसाट

श्रीगोंदा (प्रतिनिधी) । 30 - मागील 16 वर्षांपासून ठवाळ दाम्पत्य विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटपाचा उपक्रम राबवत असून, तो समाजाला आदर्शवत असा उपक्रम असून, तो कौतुकास्पद आहे. असे मत गटविकास अधिकारी अलका शिरसाठ यांनी व्यक्त केले. 
श्रीगोंदा पंचायत समिती सदस्या अनुराधा ठवाळ यांनी त्यांना मिळणार्‍या  मासिक भत्याच्या मानधनातून आढळगाव येथील जि.प शाळा, हायस्कूल तसेच कोकणगाव, घारगाव, भावडी, पारगाव या शाळेतील जवळपास 1223 विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्याचे वाटप केले. पारगाव सुद्रिक येथील जि. प शाळेत नुकत्याच झालेल्या शालेय साहित्य वाटपाच्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून गटविकास अधिकारी अलका शिरसाठ उपस्थित होत्या. यावेळी त्या बोलत होत्या. त्यानंतर बोलताना अनुराधा ठवाळ म्हणाल्या की, गरिबीमुळे आम्हाला शिक्षण घेता आले नाही. परंतु सावित्रीबाई फुले आणि ज्योतीबा फुले यांच्यामुळे स्त्रियांना शिक्षण घेण्याचा अधिकार प्राप्त झाला. तसेच डॉ.बाबासाहेब आंबेडकरांमुळे संविधानाच्या माध्यमातून जगण्याचा आणि मतदानाचा अधिकार मिळाला. त्यामुळे आज सर्वच क्षेत्रात महिला आघाडीवर असून, त्याचा आपल्याला सार्थ आभिमान असल्याचे त्यांनी सांगितले. माजी जि.प.सदस्य अनिल ठवाळ म्हणाले की, फुले आंबेडकर चळवळीचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आम्ही दोघे पती पत्नी अहोरात्र समाजासाठी झटत आहोत. आपण आढळगाव गटाचे जि. प सदस्य असताना साडेचार कोटींची कामे त्या गटात केली असून, आजही पंचायत समितीच्या माध्यमातून आपले काम चालू असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच यापुढच्या काळातसुद्धा शालेय साहित्य वाटपाचा कार्यक्रम आपण सुरु ठेवणार असल्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यान या शालेय साहित्य वाटप कार्यक्रमाच्यावेळी ठवाळ दाम्पत्याचा शाळेत शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.