Breaking News

कामत समर्थनार्थ 25 काँग्रेस नगरसेवक देणार राजीनामा

मुंबई, दि. 08 - मुंबई महापालिका निवडणुकांच्या तोंडावर काँग्रेससमोरच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची चिन्ह असून पालिकेतील काँग्रेसचे 25 नगरसेवक माजी  खासदार गुरुदास कामत यांना समर्थन देण्यासाठी राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत.

सध्या मुंबई महानगरपालिकेत काँग्रेसचे 52 नगरसेवक आहेत. यातील कामत गटाच्या 25 नगरसेवकांनी राजीनामा देण्याचा इशारा दिला आहे. कामतांच्या  राजकीय संन्यासाला विरोध दर्शवण्यासाठी असंतुष्ट काँग्रेस नगरसेवक धरणे आंदोलन करत आहेत. माजी आमदार कृष्णा हेगडे यांनी मंगळवारीच पक्षनेतृत्वाला पत्र  लिहून मुंबई अध्यक्ष संजय निरुपम यांच्या कार्यशैलीवर नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे मुंबई पालिकेसारख्या महत्वाच्या निवडणुकीआधी काँग्रेस पक्षात पडलेली  उभी फूट पक्षाला घातक ठरण्याचे संकेत आहेत.
पालिका तोंडावर असतानाच मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांच्याविरोधात गुरुदास कामत, कृष्णा हेगडे आणि इतरांनी दंड थोपटले आहेत. त्याचाच भाग  म्हणून काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा देऊन गुरुदास कामत यांनी श्रेष्ठींना अप्रत्यक्ष इशाराच दिला आहे.