Breaking News

23 एकरच्या प्रकरणाचे कलिनाशी साधर्म्य

तामसेकरांसह मिळकत व्यवस्थापनाच्या भुमिकेवर संशय

मुंबई, विशेष/प्रतिनिधी, दि. 08 - छगन भुजबळ यांच्या एमईटी या शिक्षणसंस्थेला दिलेल्या नाशिकस्थित 23 एकर जागेचे प्रकरण अंधेरी साबांच्या कलीना  प्रकरणाशी साधर्म्य दाखवित असल्याचे साबांसचिव सखाराम तामसेकर यांच्या तोंडी खुलाशावरून स्पष्ट झाले आहे तर साबां मिळकत व्यवस्थापन विभागाने दिलेले  उत्तर देखील या शक्यतेला दुजोरा देत आहे.
शासकीय जागांवर खाजगी हक्क प्रस्थापित करण्याची स्पर्धा महाराष्ट्रात सुरू आहे. या स्पर्धेत प्रशासनातील भ्रष्ट प्रवृत्ती मोलाचे योगदान देत असल्याचे चौकशीअंती  स्पष्ट होते आहे. खाजगी विकासक शासनातील मंत्र्यांशी असलेले हितसंबंध वापरून शासकीय जागा लाटण्याचे उद्योग सर्रास करीत आहेत. महाराष्ट्र सदन घोटाळा  याच हितसंबंधाचे अपत्य आहे. त्यासोबत मुंबई साबांचा कलीना भुखंड प्रकरणच नाहीतर नाशिक जिल्ह्यातील गोवर्धन शिवारातील 23 एकर जागेचे प्रकरण देखील  अशाच हितसंबंधांतून जन्माला आलेले अनौरस अपत्य आहे. फरक इतकाच की नाशिकच्या प्रकरणात थेट लाभार्थी स्वतः तत्कालीन साबांमंत्री छगन भुजबळ हेच  आहेत. या सर्व घोटाळ्यांची जबाबदारी भुजबळ यांच्यावर टाकून प्रत्यक्षात या प्रकरणांची फाईल हलविणारे लाभार्थी साबांअभियंते खुले आम वावरत आहेत.  भुजबळ आणि त्यांचे पुतणे आर्थरच्या कोठडीत तर भुजबळांच्या खांद्याला खांदा लावून वादग्रस्त ठरलेले प्रत्येक प्रकरण हाताळणारे सर्वच अभियंते मोकाट हे चित्र  तपास यंत्रणेच्या हेतूवरच संशय व्यक्त करीत आहे. इतकेच नाहीतर या प्रकरणात छगन भुजबळ यांना मदत करणारी अभियंत्यांची यंत्रणा किती तरबेज होती याची  कल्पना विद्यमान साबांसचिव सखाराम तामसेकर आणि साबांमिळकत व्यवस्थापनाच्या खुलाश्यातून येते.
तामसेकरांची चालाखी
मुंबईचे कलिना आणि नाशिकचे 23 एकरचे प्रकरण घडले तेंव्हा दोन्ही ठिकाणी सखाराम तामसेकर हेच तत्कालीन मुख्यअभियंता म्हणून कार्यरत होते.  तामसेकर हे मुख्यअभियंता असणे आणि तत्कालीन साबांमंत्री छगन भुजबळ यांच्याशी संबंध जोडले जाणारे घोटाळे होणे हा निव्वळ योगायोग कसा असू शकेल या  दोन्ही प्रकरणांत तत्कालीन मुख्यअभियंता सखाराम तामसेकर यांनी चलाखी दाखविली म्हणा किंवा साबांमंत्र्यांच्या लाभात निर्णय घेऊन हवं ते पदरात पाडून  घेतले म्हणा, तामसेकर यांचा थेट संबंध या प्रकरणात टाळता येणे अशक्य आहे.
खुलासाच संशयास्पद
कलीना आणि 23 एकरचे प्रकरण घडले तेव्हा तामसेकर मुख्य अभियंता असणे हा निव्वळ योगायोग असू शकत नाही तसेच या प्रकरणांशी संबंध  असलेल्या कागदपत्रांची फाईल गहाळ होणे हे देखील ‘मॅनेज’मेंटचे कौशल्य मानावे लागेल. या संदर्भात तत्कालीन मुख्यअभियंता तामसेकर यांनी आपल्या  बचावासाठी केलेला खुलासा देखील हास्यास्पदच नव्हे तर बेजबाबदारपणाचा कळस म्हणून एकुणच संशय बळावण्यास कारणीभूत ठरणारा असाच आहे. केवळ  तामसेकरच नाही तर साबां मिळकत व्यवस्थापन विभागही या सार्‍या प्रकरणात ‘मॅनेज’मेंटचीच भुमिका घेत असल्याचे दिसत आहे.