Breaking News

मनुस्मृतीच्या राखेतील दैत्य अजूनही छळतोय!

काल म्हटल्याप्रमाणे आजच्या काळात जातीयवादावर बोलणे चेष्ठेचा विषय ठरू शकतो. आज वरवर पाहता जातीय वादाची कोळीष्टक पानगळीसारखे गळून  पडल्याचे दिसत असले तरी त्याचे अवशेष मात्र मध्येच अंकूरतात आणि नव्याने पालवी फुटलेल्या वृक्षासारखे पुन्हा जोम धरतात. याचा प्रत्यय अधुनमधुन घडत  असलेल्या क्रुर घटनां देतच आहेत. कालच्या भागात आपण या क्रुर घटनांचा उगम असलेल्या मनुस्मृतीच्या तीन अध्यायातील जाचक अटींचा परामर्श घेतला. खरे  तर या मनुस्मृतीच्या प्रत्येक ओळीत, प्रत्येक शब्दात बहुजन द्वेष ठासून भरला आहे. प्रत्येक ओळीतून बहुजनांना दुय्यमच नव्हे तर शुद्रादी शुद्र स्थान देऊन  ब्राम्हणाचे वर्चस्व सिध्द करण्याचा खोडसाळ प्रयत्न साधलेला दिसतो आहे.
मनुस्मृतीने जेष्ठ-श्रेष्ठता ब्राम्हणांना प्रदान केल्यानंतर समाजाच्या छातडावर नाचून नंगा हैदोस घालणे हाच त्यांचा धर्म बनला. अत्याचार केले तरी ते पुण्यवंत.  त्यांना प्रायश्‍चित्त देण्याची तरतूद नाही. मनुस्मृतीचा 8 व्या अध्यायातील 378, 379, 383 ओव्या हेच सांगतात. या उलट हिंदू मनुष्याने रक्षिता, अरक्षिता  ब्राम्हणीतून कुणाचीही गमन केले तर त्यास चटईत गुंडाळून जाळावे किंवा त्याचे अंगच्छेदन करावे अशी तरतुद मनुस्मृतीच्या 8 व्या अध्यायातील 374, 377 मध्ये  केली आहे. राज दरबारी ब्राम्हणालाच मंत्री ठेवण्याचे राजावर बंधन मनुस्मृतीने घातले. ब्राम्हण नावाच्या कुण्या हिंदूकडून पिडा उद्भवल्यास त्याला राजद्रोही ठरवून  सक्तमजूरी शिक्षा देण्यास मनुस्मृतीच्या 9 व्या अध्यायाने फर्मावले. या मनुस्मृतीने ब्राम्हण हा पुर्ण शक्तीशाली होता. त्याच्यात दैवी शक्ती होती. शाप आणि  उपशापाने तो नाश आणि निर्मिती करण्याची क्षमता बाळगून आहे ही अंधश्रध्दा बहुजनांच्या मनावर खोलवर रूजविली होती. त्याचे परिणाम आजही जाणवत  आहेत. ब्राम्हण नावाचा माणूस सेना, हत्ती, घोडे यांसह राजाचा नाश शापाने करू शकेल आणि इच्छा झाल्यास पुन्हा नवी सेना, नवे हत्ती, नवे घोडे, नवे राजे तो  उत्पन्न करू शकेल असा त्याचा पराक्रम आहे. सबब सर्वांनी भिऊन वागावे. हा अध्याय 9 मध्ये 313 कलमात असलेला उल्लेख आणखी वेगळे काय सांगतो.  ब्रम्हदेवाचा अवतार असलेला हा ब्राम्हण इतका सार्थ्यवान असेल तर मग देशाच्या सीमा राखण्यासाठी लक्ष करोडोंचा खर्च आपण फालतू वाया घालवून बसलो नाही  का?
आज शिक्षण प्रसारामुळे मनुस्मृतीला लाथाडले गेले असले तरी हजारो वर्षांचा पगडा बहुजनांवर कायम आहे. कमी अधिक प्रमाणात का होईना ब्रम्ह धर्माविषयी  आमच्या मनात पुर्वांपार चालत आलेली भिती कायम आहे. आजही अनेक सुशिक्षित कुटूंबात देखील पुर्वांपार चालत आलेले देवत्व नाकारून ब्रम्हहस्तक्षेप  नाकारण्याचे धाडस दाखविले जात नाही पाचवी पुजण्यापासून अंत्ययात्रेची चिता पेटविण्यापर्यंत या देवाच्या दलालांचा हस्तक्षेप आम्हाला नाकारता येत नाही  म्हणूनच हजारो वर्षांपुर्वीची ही मनुस्मृती  जाळली गेली असली तरी तिच्या राखेत दडलेला तो राक्षस आजही बहुजनांसमोर दैत्य म्हणून उभा आहे.