Breaking News

शेतकरी आत्महत्या करतात; मोदी उत्सव : राहुल गांधीची टीका

नवी दिर्ल्ली, दि. 29 - विदर्भात शेतकरी आत्महत्या करत आहेत आणि दिल्लीत इंडिया गेटवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार उत्सव साजरा करत आहे, असे म्हणत काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी ‘मशाल मोर्चा‘दरम्यान सरकारवर निशाणा साधला. 
राजधानी दिल्लीतील वीज, पाणी संकटाच्या मुद्द्यांवर शनिवारी काँग्रेसने काढलेल्या मशाल मोर्चाला रोड शोचे स्वरूप आले. दिल्ली पोलिसांनी अखेरच्या क्षणी सुरक्षेच्या कारणावरून मशाल पेटविण्याची परवानगी दिली नाही. राहुल गांधी यांनी या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर कडाडून टीका केली. नरेंद्र मोदी आणि केजरीवाल हे दोघेही खोट्या आश्‍वासनांचे राजकारण करत आहेत. आम्ही महात्मा गांधीजींच्या विचाराने राजकारण करतो. नुकसान झाले तरी खोटेपणाचा आधार घेत नाही. हा इंटरनेट, सेल्फीचा काळ आहे. मोदी आणि केजरीवाल यांना वाटते, की आपण जनतेला कोणत्याही क्षणी मूर्ख बनवू शकतो, असे राहुल गांधी म्हणाले. मोदी सरकारच्या द्विवर्षपूर्तीनिमित्त इंडिया गेटवर आयोजित कार्यक्रमावरही त्यांनी टीका केली.