Breaking News

विकासाच्या नावावरून बोलघेवडेपणाचा कळस !

देशातील राजकीय परिस्थिती आता एका निर्णायक वळणावर येवून ठेपली असून, सत्ता मिळवण्यासाठी, व ती टिकवण्यासाठी सर्व शक्ती पणाला लावायची, असाच  एककलमी कार्यक्रम आजमितीस तरी सत्ताधार्‍याकंडून राबवला जात आहे. त्यासाठी यापूर्वीच्या राष्ट्रीय नेत्यांना, काँगे्रसच्या माजी पंतप्रधांनाना दुषणे देण्यात  सध्याच्या पंतप्रधानासह भाजपा पक्षाने धन्यता मानली आहे. तत्कालीन परिस्थिीतमध्ये त्यांनी घेतलेले निर्णय, आपल्या सामर्थ्यांने चालविलेले राज्य आणि आजची  भरभराट यांची सांगड घातल्यास त्यांचे महत्व किंचितही दुर्लक्षित करता येणार नाही. मात्र आपण काय करतोय हे न सांगता, स्वता:च्या कामाचे मूल्यमापन न  करता या पुर्वींच्या म्हणण्यापेक्षा काँगे्रसच्या पंतप्रधानांनी  काहीच काम केले नाही असा घोषाच सत्ताधार्‍याकडून सातत्याने करण्यात येत आहे. काँगे्रससह  आघाडीला कंटाळल्यामुळेच सर्वसामान्य जनतांनी भाजपाला भरभरून मतदान दिले, ते चांगल्या प्रशासनासह अच्छे दिन येतील म्हणून, मात्र या दोन वर्षात आपण  केलेल्या कामाचा आढावा घेण्याऐवजी आपली पाठ आपणच बडवून घेत असल्याचा बडेजाव पंतप्रधान मोदीसह सत्ताधारी पक्षातील नेत्यांचा दिसला. मात्र  सर्वसामान्य जनतेतून मात्र याबद्दल स्पष्ट नाराजी दिसत आहे, भाजपाच्या खासदांरानी बोलघेवडेपणाचा कळस गाठला असून, अनेक खासदांर महोदयाची बेताल  वक्तव्ये सुरूच आहे, त्यामुळे मोदी सरकारला स्पष्टीकरण देता देता नाकीनऊ आणले असले, तरी ती भाजपाची मातृसंस्था असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचीच  एक रणनिती असल्याचे जनतेंनी पुरेपुर ओळखले आहे. त्यामुळेच बोलघेवडेपणा करत, केवळ घोषणेच्या वल्गना नको, तर त्यांना प्रत्यक्षात विकास हवा आहे,  त्यांच्या विकासाच्या संकल्पना खुप मोठया आहेत, असेही नाहीत, त्यांना त्यांच्या मुलभूत गरजा, पुर्ण होईल एवढीच त्यांची माफक अपेक्षा. देशातील 10 राज्यात  दुष्काळाच्या झळा तीव्र असतांना, त्यांचे अश्रू पुसण्यास सरकार खुप उशीरा सरसावले, तर दुष्काळ जाहीर करण्यासाठी महाराष्ट्र शासनाला तब्बल मे चा महिना  उजडावा लागला, ते ही उच्च न्यायालयाने सरकारचे कान उपटल्यांनतर. आजही रोजगार , महागाई, दुष्काळ, शेतकर्‍यांचे प्रश्‍न गंभीर असतांना त्याकडे साफ दुर्लक्ष  करतांना केवळ विरोधकांना संपवणे हा एककलमी कार्यक्रम, सत्ताधारी भाजपाने आखला आहे. राज्य करणे म्हणजे सूड उगवणे नव्हे, मात्र याकडे सोयिस्कररित्या  दुर्लक्ष करून, आपल्या कारभाराचा गाडा हाकणे सत्ताधार्‍यांनी सुरू ठेवले आहे. केंद्रामध्ये अजूनही तीन वर्ष सरकारच्या हातात आहे, या तीन वर्षात तरी  लोकाभिमुख कारभार करण्यावर, व सरकार चालवण्यावर मोदी लक्ष देतील ही सर्वसामान्यांची अपेक्षा आहे. देशातील विरोधी पक्ष देखील अशक्त असल्याचेच चित्र  आहे. सरकारवर नेमका वचक कशाचा ठेवायचा हाच प्रश्‍न विरोधीपक्षांना आहे, त्यामुळेच देशाचा कारभार एकांकी चालू असल्याचे नेहमीच जाणवते. मोदी सरकारने  आतंरराष्ट्रीय संबधात घेतलेली झेप, व आंतरराष्ट्रीय स्तरावर वाढलेला भारताचा वचक याच काय तेवढया जमेच्या बाजू म्हणता येईल!