Breaking News

मुंबई इंडियन्सची पुन्हा पराभूत

हैदराबाद : सलामीवीर व कर्णधार डेव्हीड वॉर्नरच्या तडाखेबंद नाबाद 90 धावांच्या जोरावर सनरायझर्स हैदराबादने आयपीएलच्या यंदाच्या मोसमातील आपला पहिला विजय नोंदवून गतविजेत्या मुंबई इंडियन्सचा 7 विकेट्सने धुव्वा उडवला. मुंबईने दिलेल्या 143 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबादने 17.3 षटकांत 3 फलंदाजांच्या मोबदल्यात 145
धावा फटकावल्या.
राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना अडखळत्या सुरुवातीनंतर मुंबईकरांनी समाधानकारक मजल मारली. हैदराबादचीही सुरुवात अडखळती झाली. पहिल्याच षटकात टिम साऊदीने धोकादायक शिखर धवनला माघारी धाडत यजमानांना धक्का दिला. यानंतर वॉर्नर व मोइसेस हेन्रीकेस यांनी 66 धावांची भागीदारी करून संघाला सावरले. दरम्यान, सहाव्या षटकात हरभजनसिंगच्या गोलंदाजीवर यष्टिरक्षक पार्थिव पटेलने वॉर्नरला यष्टिचीत करण्याची संधी सोडली. पुढे याचा मोठा फटका मुंबईला बसला.
साऊदीने पुन्हा एकदा मुंबईला यश मिळवून देत हेन्रिक्स (20) बाद केले. यानंतर इऑन मॉर्गनही (11) फारशी चमक न दाखवता साउदीचाच शिकार ठरला. या वेळी मुंबईकर पुनरागमन करणार, असे दिसत होते. मात्र, वॉर्नरने अखेरपर्यंत नाबाद राहून हैदराबादच्या पहिल्या विजयावर शिक्का मारला. वॉर्नरने 59 चेंडूंत 7 चौकार व 4 षटकारांसह नाबाद 90 धावा कुटल्या. दीपक हुडाने त्याला अखेरपर्यंत साथ देताना 9 चेंडूंत नाबाद 17 धावा फटकावल्या. मुंबईकडून साउदीने चांगला मारा करताना यजमानांचे तिन्ही बळी मिळवले.
तत्पूर्वी, अंबाती रायुडूचे (49 चेंडूंत 54 धावा) संयमी अर्धशतक व युवा कृणाल पांड्याची (28 चेंडूंत नाबाद 49 धावा) फटकेबाजी या जोरावर मुंबईने अडखळत्या सुरुवातीनंतरही हैदराबादसमोर 6 बाद 142 अशी समाधानकारक मजल मारली. कर्णधार रोहित शर्मासह प्रमुख फलंदाज अपयशी ठरल्यानंतर रायुडू व कृणाल यांनी मुंबईला सावरण्यात मोलाचे योगदान दिले.