Breaking News

जोकोविच, सेरेनाला स्पोर्ट्स ऑस्कर

बर्लिन, दि. 20 - यंदाच्या लॉरेस जागतिक क्रीडा पुरस्कारावर टेनिसपटूंचा वरचष्मा राहिला. पुरुष आणि महिला या दोन्ही विभागांत सर्वोत्तम टेनिसपटू ठरले. नोव्हाक जोकोविच आणि सेरेना विल्यम्स यांनी हा मान पटकावला. हा पुरस्कार स्पोर्टस ऑस्कर म्हणून ओ

ळखला जातो.
अर्जेंटिना आणि बार्सिलोनाचा महान फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी याला पाचव्यांदा नामांकन मिळाले होते; पण त्याला या पुरस्काराने पुन्हा हुलकावणी दिली. जोकोविचने तिसर्‍यांदा मोसमातील सर्वोत्तम क्रीडापटूचा हा पुरस्कार मिळविला. यापूर्वी 2012 आणि गेल्या वर्षी त्याला स्पोर्टस ऑस्कर मिळाले होते. सेरेनानेसुद्धा तिसर्‍यांदा हा मान मिळविला.
जोकोविचचे वर्चस्व अपेक्षित होते. त्याने गेल्या मोसमात ऑस्ट्रेलियन, विंबल्डन आणि अमेरिकन या तीन ग्रँड स्लॅम स्पर्धा जिंकल्या. याशिवाय फ्रेंच ओपनमध्ये तो उपविजेता होता. जोकोविचने फुटबॉलपटू योहान क्रायफ आणि फॉर्म्युला वन ड्रायव्हर निकी ल्युडा यांचे आभार मानले. त्याने हा पुरस्कार त्यांनाच अर्पण केला. जोकोविचला यंदाच्या जागतिक फॉर्म्युला वन मालिकेत आघाडीवर असलेल्या जर्मनीच्या निको रॉस्बर्ग याच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यानंतर त्याने ही भावना व्यक्त केली आणि या दोन खेळाडूंना पुरस्कार अर्पण केला. या खेळाडूंनी निर्माण केलेला वारसा अभिमानास्पद असल्याचे तो म्हणाला. सेरेनाला दहाव्या वेळी नामांकन मिळाले होते. तिने गेल्या मोसमात तीन ग्रँड स्लॅम स्पर्धा जिंकल्या, मात्र सेरेना या कार्यक्रमास उपस्थित राहू शकली नाही.
सर्वोत्तम संघाचा पुरस्कार विश्‍वविजेत्या न्यूझीलंड रग्बी संघाला; तर पुनरागमनाचा पुरस्कार न्यूझीलंडचा रग्बीपटू डॅन कार्टरला मिळाला.