Breaking News

माणूस जीवंतच राहीला नाही तर देशप्रेम कुणाला सांगणार?

माणूस मुर्ख बनु शकतो फक्त मुर्खात काढणारा धुर्त, चाणाक्ष आणि प्रसंगावधान बाळगणारा असावा. सध्या देशात जे काही सुरू आहे. त्यावरून हाच एक निष्कर्ष काढता येऊ शकतो. या निष्कर्षापर्यंत पोहचून त्यावरच ठाम राहण्यासाठी अगदी राम-बाबरी प्रकरणांपासून आज कालच्या तृप्ती-रोहित-कन्हैय्या सारख्या वेगवेगळ्या क्षेत्रात घडत असलेल्या प्रकरणांचा उहापोह करणे क्रमप्राप्त आहे.
जगाच्या पाठीवर सर्वात मोठी प्रगल्भ लोकशाही म्हणून मिरविणार्‍या या भूमीचा इतिहास काय सांगतो या भुमीचे नेतृत्व ज्यांच्या हातात होते. त्या तत्कालीन मंडळींनी जनतेला वेड्यात काढूनच आपल्या अधिसत्तेचा अजेंडा राबविला. अगदी मुघलादी काळापासून इतिहास तपासल्यानंतर ही बाब प्रकर्षाने जाणवते. ब्रिटीश काळही या निष्कर्षाला अपवाद नाही. स्वातंत्र्योत्तर भारत देशात तर जनतेला वेड्यात काढून सत्ता राबविण्याची परंपराच सिध्द झाली आहे.
आणिबाणी नंतर लोकशाही अधिक प्रगल्भ झाली असे नेहमी बोलले जाते. आणिबाणीचे चटके सोसलेल्या भारतियांना वेड्यात काढूनच जनता परिवाराने भारताची सत्ता हस्तगत केली. त्यानंतर स्वतःला विद्वान समजणार्‍या जनता परिवाराने केंद्रीय सत्ता हस्तगत केली. त्यानंतर विद्वान सत्ताधारी मंडळींच्या चुका हेरून पुन्हा जनतेला वेड्यात काढण्याची संधी काँग्रेसने सत्तेत परावर्तीत करून घेतली त्यानंतर सत्तेच्या प्रदिर्घ वनवासानंतर तत्कालीन जनता परिवारातील काही मंडळींनी पुन्हा इतिहासाचा दाखला देत बाबराचा मुडदा उकरून रामाची अस्मिता जागविली आणि बाबरीला उद्ध्वस्त करतांना शहीद मुडद्यांच्या मुंडक्यांची शिडी चढून जनसंघ-जनता-भाजप परिवार सत्तेच्या बोहल्यावर चढला. पुन्हा इतिहासाची पुनरावृत्ती, पुन्हा त्याच वेड्यात काढण्याच्या शैलीचा वापर करून काँग्रेस, 15 वर्षानंतर पुन्हा भाजप एनडीए असा हा वेड्यांच्या बाजारात सत्तेच्या व्यापार्‍यांचा यशस्वी प्रवास.
अलिकडच्या काळात घडत असलेल्या बहुचर्चित घटनाही याच प्रवासातील एक थांबा आहे. वास्तविक राष्ट्र विकास, राष्ट्रीय उत्पन्न, जनतेचा विकास आणि एकुणच प्रगती या बाबींशी या  घटनांचा कुठलाच संबंध नाही. उलट अशा घटना घडतात तेव्हा राष्ट्र कित्येक वर्ष प्रगतीच्या वाटेवर मागे पडते. तरीदेखील सर्वच राजकीय पक्ष अशा घटना कायम चर्चेत ठेवून त्याभोवतीच राजकारण फिरते ठेवतात. कुणी विरोधात तर कुणी समर्थनार्थ देशाला जाळण्याची तयारी संतत सुरू ठेवतात. बापडी जनताही त्यांना देव मानून त्यांच्यामागे फरफटत राहते आणि म्हणूनच या घटना अनुत्पादितच नव्हे तर देशहिताच्या दृष्टीने हानीकारक खर्चिक असूनही देशाच्या अजेंड्यावर अग्रस्थानी आहेत. हे आमच्या लोकशाहीचे दुर्देवच म्हणायला हवे.
रोहीत वेमुला प्रकरण घडल्यानंतर राजधानीत अचानक कन्हैय्याकुमार नामक नेतृत्व उदयाला आले. त्यापाठोपाठ महाराष्ट्रात तृप्ती देसाई नावाचं वादळ घोंघावू लागले. कन्हैय्या कुमार असो नाही तर तृप्ती देसाई यांचे आंदोलन सामान्य माणसाच्या दृष्टीने कुठलेच मुल्य नसलेले आंदोलन आहे. देशात आज अनेक प्रश्‍न आहेत. सामान्य माणसाचा जीवन मरणाचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. दुष्काळाने महाराष्ट्र होरपळत आहे. देशप्रेम, स्त्री पुरूष समान हक्क, धर्म आस्मिता या बाबी महत्वाच्या आहेत, असाव्यात मात्र जेव्हा माणूस जीवंत असेल तेव्हा या गोष्टींचे महत्व आहे. या देशात माणूसच राहीला नाही तर देशप्रेम, स्त्रीपुरूष समानता, धर्म या गोष्टींचे मुल्य कुणाला सांगणार? याचे भान तरी तृप्ती देसाई-कन्हैय्या कुमार यांनी किंवा त्यांचा बोलविता धनी यांनी ठेवायला नको का?