Breaking News

नाविण्यपुर्ण उपक्रमांद्वारे सातारा स्मार्ट सिटी बनवणार : आ. भोसले

सातारा, दि. 19 - शहरांमध्ये एकदिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. आपल्या शहरात मात्र आठवड्यातून एकदाच पाणीपुरवठा बंद ठेवला जातो. शहरातील बहुतांश भागात रस्ते, वीज, पाणी, आरोग्य यासह सर्व प्रकारच्या नागरी सुविधा पुरवण्यात आल्या आहेत. अशा विकसीत वार्डांमध्ये अत्याधुनिक नाविण्यपुर्ण उपक्रम राबवू
न सातारा शहराला स्मार्ट सिटी बनवणार, असे प्रतिपादन आ. श्री. छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले. 
शहरातील वार्ड क्र. 19 मध्ये नगरसेवक अविनाश कदम यांच्या वार्डफंडातून वाय-फाय सुविधेच्या शुभारंभप्रसंगी आ. शिवेंद्रसिंहराजे बोलत होते. यावेळी नगराध्यक्ष विजय बडेकर, उपनगराध्यक्ष जयवंत भोसले, नगरसेवक जयेंद्र चव्हाण, अविनाश कदम, सुजाता गिरीगोसावी, अमोल मोहिते, प्रवीण पाटील आदी मान्यवरांसह दूरध्वनी विभागाचे योगेश भागवत उपस्थित होते.
नगरसेवक अविनाश कदम यांच्या वार्ड फंडातून वार्ड क्र. 19 मधील मंगळवार पेठेत दूरध्वनी केंद्राजवळ अत्याधुनिक वाय-फाय यंत्रणा कार्यान्वीत करण्यात आली आहे. ही यंत्रणा दूरध्वनी केंद्रापासून 200 मीटर व्यासात चालू करण्यात आली असून या सुविधेमुळे नागरिकांना अत्याधूनिक तंत्रज्ञानाशी निगडीत ई बँकींग, ई बिलींग, इंटरनेटसह मुलांसाठी शालेय माहिती आदी सुविधा मोफत उपलब्ध होणार आहेत. या यंत्रणेचा प्रारंभ करुन आ. शिवेंद्रसिंहराजे म्हणाले की, शासनाच्या काही निकषांमध्ये न बसल्याने सातारा शहराचा शासनाच्या स्मार्ट सिटी योजनेमध्ये समावेश होवू शकला नाही. असे असले तरी आपण नागरी सुविधांसह विविध प्रकारच्या नाविण्यपुर्ण योजना आणि उपक्रम राबवून आपले शहर स्मार्ट बनवण्यास प्राधान्य देणार आहोत. दोन वर्षापुर्वी याच वार्डात आपण सीसीटीव्ही यंत्रणा बसवून पहिला सुरक्षित वार्ड केला आहे. या सुविधेमुळे या वार्डातील गुन्हेगारीला आळा बसला असून नागरिक आणि खास करुन महिलांची सुरक्षितता वाढली आहे. आता याच वार्डातून आपण आधुनिक तंत्रज्ञान, इंटरनेटचा फायदा नागरिकांना मिळावा, यासाठी वाय-फाय यंत्रणा सुरु केली आहे.
सातारा शहरातील पहिला वाय-फाय वार्ड झाला आहे. शहरातील काही भागातील पाणीपुरवठ्याची समस्या वगळता सर्वत्र नियमित पाणीपुरवठा होत आहे. ज्या भागात पाण्याची समस्या आहे, त्या भागातील समस्येच्या मुळापर्यंत जावून पाणीपुरवठा तातडीने सुरळीत करण्याच्या सुचना पालिका प्रशासनाला दिल्या आहेत. सर्वत्र दर्जेदार रस्ते झाले आहेत. अत्याधुनिक एलईडी दीव्यांमुळे प्रमुख रस्ते आणि चौक उजळले आहेत. ज्या भागात विकासकामे पुर्ण झाली आहेत त्या भागात वेगवेगळ्या नाविण्यपुर्ण योजना राबवण्यास प्राधान्य दिले जाणार आहे. आपले शहर एक आदर्श, सुंदर आणि स्मार्ट शहर निर्माण करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे आ. भोसले यांनी यावेळी स्पष्ट केले.
बाळासाहेब भाटे यांनी आभार मानले. कार्यक्रमास विलास बोडस, महादेव खुडे, अशोक पंडीत, रवी माने, संजय पवार, राजेंद्र भागवत, समीर थोरात, सतीश कुलकर्णी, सुधीर भिडे, सुधीर पाध्ये, संदीप निपाणे, मयुर निपाणे आदींसह वार्डातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.