Breaking News

जगाच्या उध्दारासाठी संतांचे कार्य अद्वितीय ः शेटे

अहमदनगर, दि. 20 -  संतांनी जगाच्या उद्धारासाठी आपले संपूर्ण आयुष्य वेचले आहे. संत हे जगासाठी काम करीत असतात. समाजाच्या विकासासाठी अनेक संतांनी बहुमोल योगदान दिले आहे. राष्ट्रसंत कैकाडीमहाराजांनी आपल्या कार्यकुशलतेने समाजाला घडविले. समाज प्रबोधनासाठी कैकाडी महाराजांनी महाराष्ट्रात खेडोपाडी जाऊन कीर्तन, प्रवचन करून मोठे कार्य केले. त्यांचे काम महान असून, कीर्तन व प्रवचनाच्या माध्यमातून त्यांनी मानवतेला जागे ठेवून समाजामध्ये जागृती केली असे प्रतिपादन शेटेमहाराज यांनी केले.
कैकाडी समाज संघटनेच्या वतीने राष्ट्रसंत कैकाडीमहाराज यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमाचे उद्घाटन ज्येष्ठ कार्यकर्ते फुलचंद जाधव यांच्या हस्ते दीपप्रज्ज्वलनाने करण्यात आले. यावेळी प्रवचनात शेटेमहाराज बोलत होते. याप्रसंगी के. एस. माने, कुंडलिक जाधव, डी. आर. गायकवाड, जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. विनोद गायकवाड, सचिव रवींद्र गायकवाड, उपाध्यक्ष किशोर जाधव आदींसह समाजबांधव उपस्थित होते. यावेळी राष्ट्रसंत कैकाडीमहाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.शेटेमहाराज पुढे म्हणाले की, राष्ट्रसंत कैकाडीमहाराज यांचा जन्म रामनवमीच्या पवित्र दिवशी श्री क्षेत्र मांडवगण (ता. श्रीगोंदा) या ठिकाणी झाला. त्यानंतर महाराजांनी श्री क्षेत्र पंढरपूर येथे वास्तव्य केले. कैकाडीमहाराजांनी गाडगेमहाराज यांचे शिष्यत्व पत्करून स्वच्छता, शिक्षण व समाज प्रबोधनाचे महान कार्य केले. देव आणि संत हे वेगळे नाहीत. संत हे दुर्जनांना सज्जन बनवण्याचे काम करतात, असे ते म्हणाले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी विशाल माने, संतोष गायकवाड, शिवनाथ गायकवाड, गणेश गायकवाड, राजेंद्र गायकवाड, बाबासाहेब जाधव आदींनी प्रयत्न केले.